स्थानिक भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने मंत्री अनिल देशमुख यांच्या, तर भंडारा जिल्हा श्रमिक पत्रकार संघाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहून पत्रकार दिवस साजरा केला.
याप्रसंगी बोलतांना विकास कामांमध्ये माध्यमांची भूमिका महत्वाची, असे प्रतिपादन अनिल देशमुख यांनी केले. ‘लोकप्रतिनिधी प्रसार माध्यमे आणि विकास’ या विषयावरील परिसंवादात आमदार नानाभाऊ पटोले, आमदार नरेंद्र भोंडेकर, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी भाग घेतला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश सुपारे, प्रा.एच.एच.पारधी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी, तर संचालन प्रमोद नागदेवे यांनी केले. आभार सचिव मिलिंद हळवे यांनी मानले.
भंडारा जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार दिन कार्यक्रमात बोलतांना, समाज घडविण्याची शक्ती निष्पक्ष व सकारात्मक पत्रकारितेत आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियामुळे समाजाचे आकलन होते, तसेच जनसामान्यापर्यंत सहजरित्या पोहोचता येते, असे विचार डॉ.आरती सिंह यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती चरण वाघमारे म्हणाले, त्यांना घडविण्यात मीडियाची सम्यक टीका व सम्यक प्रोत्साहन यांचा मोठा वाटा आहे. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष विजय खंडेरा यांनी केले. डॉ.आरती सिंह यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार प्रा.वामन तुरिले व प्रा.रमेश सुपारे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना, पत्रकारांनी प्रेयसापेक्षा श्रेयसाच्या मागे लागावे, असे प्रा.तुरिले म्हणाले, तर यशस्वी पत्रकारितेकरिता पत्रकारांनी स्वत:ला घडविणे महत्वाचे, असा सल्ला प्रा.सुपारे यांनी दिला.
मंचावर प्रमुख उपस्थितात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ॠषी चहांदे, डॉ.गोपाल व्यास, संघाचे सचिव अनिल आकरे होते. संचालन यू.सी.एन.न्यूजच्या मेघा राऊत यांनी केले. आभार सकाळचे दीपक फुलबांधे यांनी मानले.