नाशिकला कला आणि संस्कृतीचे दान भरभरून मिळाले असल्याचे गौरवोद्गार अनेक सोहळ्यांत मान्यवरांकडून काढले जातात. आजवर या गौरव सोहळ्यांचा साक्षीदार राहिलेल्या महाकवी कालिदास कला मंदिरास गुरुवारी अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात मान्यवरांची नाराजी अनुभवावी लागली. कालिदास कला मंदिराची दुरवस्थेचे जाहीर धिंडवडे निघाले असताना किमान आता तरी महापालिका ही व्यवस्था सुधारण्यासाठी पुढाकार घेईल काय, असा प्रश्न या क्षेत्रातील स्थानिक मंडळींना
पडला आहे.
शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू म्हणून महाकवी कालिदास कलामंदिर नाटय़गृहाची रसिकांच्या मनात एक वेगळी ओळख आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण, भव्य तीन मजली वास्तू आणि वाहनतळासाठी प्रशस्त जागा या वैशिष्टय़ांमुळे कालिदासला अनेकांची पसंती असते. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर कुठलाही पुरस्कार सोहळा, राजकीय कार्यक्रम, चर्चासत्र, परिषदांना ‘कालिदास’ जवळचे वाटते. कालिदासला मिळणारा प्रतिसाद पाहता आयोजकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक कलावंतासाठी ‘मेकअप रूम’, ‘गेस्ट रूम’, कलाकारांच्या आरामासाठी विशेष कक्ष, याशिवाय ‘बालकक्ष’ अशी खास व्यवस्था करण्यात आली आहे. एवढे सारे असूनही केवळ व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा आणि महापालिकेच्या अनास्थेमुळे कलावंत व रसिकांना नाराज होण्याची वेळ येत आहे. नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात नाशिककरांना पुन्हा त्याचा प्रत्यय आला. ११२० आसन क्षमता असणाऱ्या कालिदासच्या खुच्र्याचे मध्यंतरी नूतनीकरण करण्यात आले, मात्र ते अल्पायुषी ठरले. सध्या अनेक खुच्र्याचे हात मोडले असून त्यावरील आवरणही फाटले आहे. आतील स्पंजही बाहेर आला आहे. काही ठिकाणी खुच्र्याना चक्क दोऱ्या बांधण्यात आल्या आहेत.
खाद्यपदार्थ सभागृहात नेण्यास मनाई असताना प्रेक्षक खाद्यपदार्थ घेऊन जातात. तो पसारा आतमध्येच टाकला जातो. काही प्रेक्षक पिचकाऱ्यांद्वारे भिंतींवर चित्रकृती साकारतात. काहींची तर नाटय़गृहात मद्यपान करण्यापर्यंत मजल गेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बसविलेल्या यंत्रणेजवळ अस्वच्छता व कचरा असल्याने तिथे पाणी का प्यायचे, असा प्रश्न आहे. कला मंदिरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. अनेक दरवाजांना कडी-कोयंडे नाहीत. खिडक्यांना काचा नाहीत. कार्यक्रम सुरू असताना अनेकदा दरुगधीचा सामना उपस्थितांना करावा लागतो. वातानुकूलित यंत्रणा शोभेची वस्तू
ठरली आहे.
नाटय़गृहात केवळ प्रेक्षकांनाच नव्हे, तर कलावंतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रंगमंचावरील ‘लेव्हल्स’ मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. पडदे स्वयंचलित नसल्याने अनेकदा अडचण होते. मेकअप रूममध्ये प्रकाश योजना, आरसा किंवा आवश्यक सोयी-सुविधांची वानवा आहे. प्रयोगानंतर कलावंतांच्या भोजनाची व्यवस्था कॅन्टीनच्या मागील बाजूस ‘बुफे’ पद्धतीने केली जाते. वास्तविक, हा परिसर कॅन्टीन आणि स्वच्छतागृहाच्या मधील जागा आहे. काहीं नाइलाज म्हणून तेथील पायऱ्यांवर वा अस्ताव्यस्त अशा खुच्र्यावर बसतात. कलावंतांसाठी जी निवास व्यवस्था केली आहे, तेथेही अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. नाटय़गृहातील व्हरांडय़ात पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही. खोल्यांमध्ये अनेक ठिकाणी ‘स्विचबोर्ड’ भिंतीपासून निखळले आहेत. बाहेर आलेल्या ‘वायर’ किंवा ‘बोर्ड’ला चिकटपट्टी लावून तात्पुरती डागडुजी केल्याचे लक्षात येते. खिडक्यांवरील पडदे अस्वच्छ आहेत. स्वच्छतागृहाची परिस्थिती यथातथाच म्हणता येईल. या एकूणच अव्यवस्थेवर अभिनेते प्रशांत दामले यांनी बोट ठेवले. किमान आता तरी महापालिकेने नाटय़गृहातील व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे, अशी स्थानिक कलावंतांची अपेक्षा आहे.
नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिराची दुरवस्था अधोरेखित करणारी ही छायाचित्रे.
कला मंदिराच्या बाहेरील आवारात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुच्र्याची ‘खास’ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बऱ्याचशा खुच्र्या गायब असल्याने संगीत खुर्ची खेळायची का, असा समज होतो.
‘स्वच्छ’ पाण्याच्या ‘कूलर’ला रंगीत पिचकाऱ्यांची साथ लाभत आहे.
नूतनीकरण करण्यात आलेल्या खुच्र्याना दोरीचा आधार देऊन मलमपट्टी करण्यात आली आहे.
रंगमंचासमोरील दर्शनी भागात कलावंत, मान्यवरांसाठी टाकलेले रेड कार्पेट जीर्ण झाले आहे.
‘ग्रीन रूम’ नसल्याने अडचण
महाकवी कालिदास कला मंदिरात कलावंतांसाठी स्वतंत्र ग्रीन रूमची व्यवस्था नाही. महिला कलाकारांना ग्रीन रूम नसल्याने अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या जी व्यवस्था आहे, त्या ठिकाणी लाइट, आरसा सगळ्यांची वानवा आहे. या संदर्भात रंगकर्मीनी आंदोलन करूनही परिस्थिती बदललेली नाही. महापालिका दुर्लक्ष करत असल्याने परिस्थितीशी जुळवून घेण्याची कसरत कलाकारांना करावी लागते.
सुधीर कुलकर्णी (कलावंत, नाटय़ लेखक, दिग्दर्शक)
(सर्व छायाचित्रे) रोहन सांबरेकर
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2014 रोजी प्रकाशित
कालिदास कला मंदिरातील सुविधांची ‘ऐसी की तैशी’
नाशिकला कला आणि संस्कृतीचे दान भरभरून मिळाले असल्याचे गौरवोद्गार अनेक सोहळ्यांत मान्यवरांकडून काढले जातात.
First published on: 22-02-2014 at 04:44 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalidas kalamandir in worse condition