कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांमध्ये एकही प्रभाग अधिकारी काम करण्यास लायक नसल्याने पालिका प्रशासनाने नवीन अधिकाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. प्रभाग अधिकारी हा जनतेसमोर रोज जाणारा पालिकेचा चकचकीत आरसा असतो. प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पालिका प्रशासनाच्या पारदर्शक कामाचे मोजमाप नागरिक करतात. सध्या प्रशासनात एकही लायक प्रभाग क्षेत्र अधिकारी नसल्याने प्रशासनाने अधीक्षक, अनुभवी अधिकाऱ्यांना प्रभाग अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पालिकेत एकूण १० अधिकारी प्रभाग अधिकारी व अन्य विभागांत कार्यरत आहेत. यामधील एकही अधिकारी प्रभाग अधिकारी म्हणून कार्यक्षम नसल्याचे प्रशासनाच्या टिपणीत म्हटले आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा ते कोपर, खडेगोळवली ते गंधारे भागात स्थानिक पातळीवर नागरिकांना पालिकेकडून सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून सात प्रभाग कार्यालये आहेत. या प्रभाग कार्यालयांमधील प्रभाग क्षेत्र अधिकारी अलीकडे अनधिकृत बांधकामे, फेरीवाले यांमध्ये व्यस्त आहेत. नागरिक हा सगळा व्यवहार उघडपणे पाहत असल्याने पालिकेची पारदर्शक, स्वच्छ, चकचकीत ही प्रतिमा मलिन होत आहे. त्यात पालिका प्रशासनाचा या प्रभाग अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याने काही प्रभाग अधिकारी पालिका पदाधिकाऱ्याच्या नातेवाइकाला गाडीत बसून अनधिकृत बांधकामे दाखव, तेथे तोडपाणी कर अशा धंद्यांत व्यस्त आहेत. काही प्रभाग अधिकाऱ्यांनी भूमाफियांशी संधान बांधून अनधिकृत बांधकामातून मलई काढण्याचा धंदा सुरू केला आहे. अनधिकृत बांधकामाच्या एका खोलीमागे दहा हजार रुपये वसूल केले जातात. अशी दररोज शेकडो बांधकामे पालिका हद्दीत सुरू आहेत. सर्वच प्रभाग अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारासंदर्भातील तक्रारी अनेक नागरिकांनी पालिककडे नावाने, निनावी पद्धतीने कळवल्या आहेत. या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली तर काम करायचे कुणी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
सध्या लेखापाल विनय कुळकर्णी, मालमत्ता अधिकारी प्रकाश ढोले व काही अधीक्षकांना प्रभाग क्षेत्र अधिकारी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पालिका मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या काही अधिकाऱ्यांना प्रभाग अधिकारी करण्यास आयुक्तांचा विरोध आहे. त्यामुळे गुंता आणखी वाढत असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.