कराडनजीकच्या कापील ग्रामपंचायातीने जीवन प्राधिकरणामार्फत २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजना साकारली असून, २४ तास नळपाणीपुरवठा योजना यशस्वी करणारे कापील हे कराड तालुक्यातील दुसरे गाव ठरले आहे. मलकापूर नगरपंचायतीच्या २४ बाय ७ योजनेचा आदर्श घेऊन कापील ग्रामपंचायतीने ही महत्त्वपूर्ण योजना राबविली आहे.  
सदर पाणी योजनेची चाचणी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या हस्ते घेण्यात आली असता ती यशस्वी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता नजीकच्या काळात मीटरने पाणीपुरवठा करणारी कापील ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे.
मलकापूरप्रमाणे २४ तास नळपाणीपुरवठा योजना कापीलमध्येही राबवावी यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १० टक्के लोकवर्गणीचा एक लाखाचा धनादेश जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द केला. योजनेचे काम तातडीने सुरू करून जीवन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानुसार संभाजी पाटील व नरेंद्र जानुगडे यांनी शिवरत्न कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून योजनेचे काम पूर्ण केले. योजनेची अंदाजपत्रकीय किंमत १ कोटी ७१ लाख असून, अंदाजपत्रके तयार करण्यासाठी जीवन प्राधिकरणाचे मार्गदर्शन घेण्यात आले. या योजनेत प्रत्येक ग्राहकास मीटर अत्यावश्यक असून, शासनाकडून योजनेतील मीटरसाठी तरतूद करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्यानंतर वार्षिक विकासनिधीतून एमएमआर मीटरसाठी ५० टक्के निधी वैशिष्टय़पूर्ण कामासाठीच्या तरतुदीतून जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणार आहे. यासाठी आनंदराव पाटील, मनोहर शिंदे यांनी प्रयत्न केले आहेत. येत्या जूनअखेर मीटरचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर मीटरने पाणीपुरवठा करणारी कापील ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, माजी आमदार भास्करराव शिंदे, मदनराव मोहिते,डॉ. सुरेश भोसले, जीवन प्राधिकरणाचे आर. जी. होलाणी यांनी सहकार्य केले.