सोलापूर जिल्हय़ासह आसपासच्या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशिवाय दुसरा पर्याय नाही. या न्याय्य प्रकल्पाची पूर्तता होण्यासाठी प्रसंगी रक्त सांडण्याची तयारी ठेवावी लागेल. अन्यथा नवीन पिढी माफ करणार नाही, असे रोखठोक सूचना काँग्रेसचे माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी केली.
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने या तिन्ही तालुक्यांतील पाण्याच्या प्रश्नावर मंगळवारी शहरानजीक मुळेगाव तांडा येथे मुक्तचिंतनर बैठक झाली. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवकते यांनी आक्रमक पवित्रा घेत पाण्याच्या प्रश्नावर सर्वानी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकाच झेंडय़ाखाली येण्याचे आवाहन केले. या बैठकीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम ऊर्फ काका साठे हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला दक्षिण सोलापुरातील स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, राज्य भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत घोडके, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, दिलीप सिद्धे, सोलापूर कृषी बाजार समितीचे संचालक सोजर पाटील, गोपाळराव कोरे, महादेव पाटील, रिपाइंचे डी. एन. गायकवाड याच्यासह सुमारे दीड हजार शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रमुख संयोजक, जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड यांनी प्रास्ताविक तर मुळेगाव तांडय़ाचे सरपंच विजय राठोड यांनी स्वागत केले.
सोलापूर जिल्हय़ातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २० वर्षांपूर्वी आमदार असताना उजनी धरणाचे पाण्याचे नियोजन बारमाहीऐवजी आठमाही करून घेतले तरी अद्याप दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा आदी बराचसा भाग पाण्यापासून वंचित राहिल्याचे सांगून देवकते यांनी, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची उपयुक्तता पटवून दिली.
माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उजनी धरण व कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पावर तपशीलवार प्रकाश टाकला. कृष्णेचे ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाटय़ाला आले असताना त्याचा वापर कोठे व कसा करायचा, याचा अधिकार राज्य शासनालाच असला पाहिजे. यासंदर्भात लवादाने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्यासाठी शासनाने ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. उजनी धरणाच्या वरील बाजूला नव्याने १९ धरणे झाल्याने उजनी धरणात कमी प्रमाणात पाणीसाठा होतो. तर या धरणावर अवलंबून राहून आणखी ६८ टीएमसी पाणी वापराच्या योजना मंजूर आहेत. त्यामुळे धरणातील पाणी पुरणार नाही. भविष्याचा विचार करता हा डोलारा टिकविण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशिवाय पर्याय नाही, असा आग्रही भूमिका त्यांनी मांडली. या वेळी बळीराम साठे यांनी पाण्याच्या प्रश्नावर सत्ता कोणाची का असेना, त्याची तमा न बाळगता सर्वानी एकत्र येऊन संघर्ष करणे क्रमप्राप्त ठरल्याचे मत व्यक्त केले.
या वेळी राजशेखर शिवदारे, चंद्रकांत घोडके, हरीश पाटील, मल्लिकार्जुन पाटील, डी. एन. गायकवाड, दिलीप सिद्धे आदींची भाषणे झाली. या बैठकीत कृष्णा-भीमा स्थिरीकरणासह वडापूर धरण, एकरूख व शिरापूर उपसा सिंचन योजना, देगाव जोडकालवा आदी प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. दक्षिण सोलापुरात गेली २० वर्षे पाण्यासाठी चिकाटीने संघर्ष करणारे उमाकांत राठोड यांचा रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी प्रसंगी रक्त सांडण्याची तयारी ठेवा
सोलापूर जिल्हय़ासह आसपासच्या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशिवाय दुसरा पर्याय नाही. या न्याय्य प्रकल्पाची पूर्तता होण्यासाठी प्रसंगी रक्त सांडण्याची तयारी ठेवावी लागेल.
First published on: 30-01-2014 at 03:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep prepared for spill blood for krishna bhima stabilization