०  शासनाला महसूलाचा लाखोचा भरुदड
०  चौकशीचा नुसता फार्स असल्याचा आरोप
०  पाणी टंचाई व पर्यावरणाचे संकट
जिल्ह्य़ातील वाळू घाटांचा अजून लिलाव होणे बाकी असतांना व वाळू उत्खनन, विक्रीला बंदी असतांना महसूल व खनिकर्म विभागाच्या छुप्या आशीर्वादाने वाळू माफियांनी देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा या सर्वात मोठय़ा नदीला विळखा घातला आहे. या नदीतून दररोज लाखो रुपयांच्या वाळूची खुलेआम तस्करी होत असल्याने शासनाला महसूलाचा प्रचंड भरुदड बसत असून खडकपूर्णा नदीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.
जिल्ह्य़ात देऊळगाव महीनजीक कोटय़वधा रुपये खर्च करून खडकपूर्णा नदीवर चोखासागर सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या धरणाच्या पूर्व भागाला खडकपूर्णा नदी वाहते. या खडक पूर्णा नदीवर अनेक वाळू घाट आहेत. राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय महसूल व खनिकर्म विभागातर्फे या वाळू घाटांची क ोटय़वधी रुपयांमध्ये हर्रासी होत असते. अजून या वाळू घाटांचा लिलावच व्हायचे आहेत. साधारणत: जुलैपासून ते नोव्हेंबर-डिसेंबपर्यंत म्हणजेच वाळू घाटांचा लिालव होईपर्यंत वाळूचे उत्खनन, विक्री व साठेबाजी यावर नियमानुसार बंदी असते. असे असतांना वाळू माफियांनी या नदीच्या वाळू घाटांना अक्षरश: विळखा घातला आहे.
या नदीच्या पात्रातून दररोज हजारो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत आहे. देऊळगावराजा तालुक्यातील सिनगाव जहॉंगीर, साऊंगी टेकाळे, जवळखेड, दिग्रस, टाकरखेड, तर सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड, राहेरी, किनगावराजा, साठेगाव, ताडशिवणी या गावानजीकच्या पात्रात मोठय़ा प्रमाणावर वाळू उत्खनन केले जात आहे. यामुळे खडकपूर्णा नदीवरील चोखासागर धरणाच्या वेस्टवेअरपासून सुरू होणाऱ्या व मेहकर लोणार तालुक्यातील गावांपर्यंत असणारे नदीपात्रातील वाळू घाट तस्करीच्या विळख्यात सापडले आहेत.
या परिसरात वाळूची खुलेआम तस्करी करणारी फार मोठी टोळी आहे. या टोळीला महसूल व खनिकर्म विभागाचे छुपे आशीर्वाद आहेत. दररोज हजारो ब्रास वाळू तस्करी होत असल्याने शासनाला क ोटय़वधीचा भरुदड बसत आहे. त्याशिवाय, खडकपूर्णा नदीच्या सुमारे वीस किलोमीटरच्या नदीपात्रात ठिकठिकाणी दहा ते पंधरा फुटाचे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे नदीपात्राला व नदीच्या अस्तित्वाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. अवैध वाळू उत्खननाने पर्यावरण धोक्यात आले असून नजीकच्या गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हा खनिकर्म अधिकारी हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत.  यासंदर्भात सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अवैध वाळू  उपसा, विक्री व साठेबाजीच्या वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. त्यावरून सिंदखेडराजाच्या तत्कालीन तहसीलदाराची बुलढाणा येथे अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली होती, मात्र संबंधित तहसिलदारांनी नंतर आपली बदली कार्यकारी पदावर करून घेतली. महसूल व खनिकर्म खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे हे अवैध वाळू उत्खनन वाढत असून त्यामुळे  खडकपूर्णा नदीची वाट लागली, असे शिंगणे यांनी उद्वेगाने सांगितले. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मोघम उत्तर दिले.
गेल्या वर्षी खडक पूर्णा व काटेपूर्णा नदीच्या पात्रातील वाळू घाटात सुमारे पंधरा क ोटी रुपयांची तस्करी झाली. हे प्रकरण महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचखोरी करून दाबल्याचा आरोप जळगांव जामोदचे पूर्णा बचाव आंदोलनाचे नेते दिनकर दाभाडे पाटील यांनी केला आहे. वाळू च्या अवैध उत्खनन, विक्री व साठेबाजीत क ोटय़वधीचा भ्रष्टाचार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी दाभाडे पाटील यांनी केली आहे. गेल्या वर्षी यासंदर्भात राज्याचे महसूल खात्याचे प्रधान सचिव, खनिकर्म खात्याचे मंत्रालय स्तरीय वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर चौकशीचा नुसता फार्स झाला, असे दाभाडे यांनी सांगितले. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.