भगवंताप्रती आपली निष्ठा आणि भक्ती अढळ असल्यास देवत्वाची जाणीव सुस्पष्टरित्या कळते. प्रपंचात राहून आत्मिक समाधान मिळविण्यासाठी राम नाम घ्या. नामजपाने मनुष्य जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल, असे मार्गदर्शन श्रीहरी महाराज यांनी केले. श्री क्षेत्र माकोडी (ता. मोताळा) येथे २५ नोव्हेंबर रोजी चैतन्य  मंदिर परिसरात खोपडी बारस उत्सवाची सांगता भव्य महाप्रसादाने झाली. हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. यावेळी ते बोलत होते.
२३ नोव्हेंबरपासून तीन दिवस खोपडी बारसच्या वार्षिक धार्मिक उत्सवानिमित्त हजारो भाविकांची मांदियाळी चैतन्य मंदिर, माकोडी येथे जमली होती. महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, दिल्ली व अन्य राज्यातूनही भाविकांनी यावेळी हजेरी लावली. चातुर्मास समाप्तीनंतर रामनाप जप यज्ञ पूर्णाहूती सोहळा, भजन, कीर्तन व नामसंकीर्तनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. २५ नोव्हेंबरला सकाळी २१ क ोटी रामनाम जपाची पूर्णाहूती यज्ञकुंडात दिल्यानंतर महाराजांनी भाविकांना कापडप्रसादाचे स्व:हस्ते वाटप केले. काकड आरतीने या उत्सवाची सुरुवात झाली. २४ नोव्हेंबरला सायंकाळी निरपूर, जळगांव जामोद, मलकापूर, शेंबा, घाटनांद्रा, लिहा, धोनखेड व अन्य ठिकाणाहून पायदळ दिंडय़ांचे आगमन झाले. रात्री ज्ञानेश्वर माऊली (निरपूर) यांचे सद्गुरू महिमा याविषयी कीर्तन झाले. त्यानंतर पहाटेपर्यंत भजनी मंडळांनी सेवा दिली. रविवारी सकाळी कराळे गुरुजींनी विकास बढे (धा.बढे), गजानन जाधव (बुलढाणा), प्रशांत पवार, राहुल राऊत, ढकचवळे (सा.मारोती), संजय जोशी (मलकापूर), भिमाशंकर (पातोंडी), संघपाल (नाशिक), भगवान मेव्हणकर (राम नगर) या दाम्पत्यांनी पूजा केली, तर अकोला येथील ब्रम्हवृंदाने पौरोहित्य केले.
भाविकांच्या सुविधेसाठी मलकापूर ते माकोडी व माकोडी ते मलकापूर अशी ४ बसेस व अन्य वाहनांची व्यवस्था आमदार चैनसुख संचेती, विनोदसेठ मुंधडा  व भाविकांनी केली होती. सायंकाळी तुळशी विवाह सोहळ्यानंतर उत्सवाची सांगता झाली.