शालेय विद्यार्थ्यांना बिस्किटे-चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्याच सतर्कतेमुळे फसला. राहुरी फॅक्टरी येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार झाला. संतप्त पालकांनी नगर-मनमाड राज्यमार्गावर रस्ता रोको केला. घटनेचे वृत्त समजताच माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पालकांचा राग शांत करून रस्ता वाहतुकीस खुला केला.
छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शाळेत येत होते. प्रसादनगर व आदिनाथ वसाहत परिसरातील १० ते १२ विद्यार्थी गादीवाले काका यांच्या शेजारील अरुंद बोळीतून येत असताना अचानक ४ ते ५ अज्ञात व्यक्तींनी विद्यार्थ्यांना गाठले. या वेळी शहाजब गणी शेख या पाचवीतील विद्यार्थ्यांने सांगितले, की आम्हाला बिस्किटे व चॉकलेट देऊन आमच्या हाताला धरून आमच्या बरोबर चला असे ते म्हणाले. बोळीत चाललेला विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकताच आजूबाजूचे नागरिक धावून आले. तोपर्यंत या अज्ञात व्यक्तींनी पोबारा केला. फिरोजा रफीक शेख, इम्रान रफीक शेख, नजिम शफीक शेख या विद्यार्थ्यांना बिस्किटे चॉकलेटचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तींनी पळवून नेण्याचा प्रयत्न होता. घटनेचे वृत्त पसरताच संतप्त पालकांनी सकाळी ११ वाजता नगर-मनमाड राज्यमार्गावर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ासमोर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे १५० ते २०० पालक रस्त्यावर उतरले. अवघ्या पाच मिनिटांत राज्यमार्गावर वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक अरुण ढुस आले. पालकांचा राग शांत करून सर्व पालकांना शाळेच्या आवारात नेले.
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात संतप्त पालकांच्या भावना समजावून घेऊन तनपुरे म्हणाले, की विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तींकडून खाऊ, बिस्किटे, चॉकलेट घेऊ नये व कोणत्याही आमिषाला बळी पडू नये अशा सूचना पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्याव्यात. प्राथमिक व माध्यमिक शाळेचे प्रत्येकी दोन शिक्षक शाळेच्या वेळे अगोदर व शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ उभे राहावे. इंजिनिअरिंग कॉलेज व विवेकानंद नर्सिग होमचे सुरक्षा कर्मचारीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मदत करतील. शाळेचे तुटलेले तार कंपाऊंड दुरुस्ती करून गेट बसविण्यात येईल. पालकांच्या समस्या जाणून घेऊन विद्यार्थ्यांची शिक्षक व पालक या दोघांनीही काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.