महालातील चिटणीसपार्कवर १० जानेवारीपासून स्वामी विवेकानंद सार्थ शताब्दीनिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. देवनाथ पीठ अंजनगावसुर्जीचे जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते संध्याकाळी ६.३० वाजता कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समितीचे संयोजक श्रीपाद रिसालदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
युवा कीर्तनकार श्रेयस बडवे याचे गोकर्ण महाबळेश्वर यावर कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कीर्तन होणार आहे. यावेळी महापौर अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, उद्योगपती रमेश मंत्री उपस्थित राहतील. ‘रामवरदायिनी’ यावर विवेक गोखले यांचे ११ जानेवारीला कीर्तन होईल. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ‘स्वामी विवेकानंद’ यावर हिंदूधर्मभूषण भरतबुवा रामदासी यांचे कीर्तन होईल. यावेळी प्रामुख्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. दिलीप गुप्ता, आमदार सुधाकर देशमुख आणि सदगुरूदास महाराज विजयराव देशमुख उपस्थित राहतील. १३ जानेवारीला पुण्याचे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्यावर कीर्तन सादर करतील.
या संपूर्ण कीर्तन महोत्सवाचा समारोप१४ जानेवारीला होणार असून श्रीकृष्णलीला व गोपालकाला यावर दिगंबर बुवा नाईक यांचे कीर्तन होईल. यावेळी वासुदेव आश्रम वाशीमचे विजयकाका पोफळी, आमदार दीनानाथ पडोळे, आमदार देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश वाघमारे उपस्थित राहतील. या कीर्तन महोत्सव परिसराला बाळशास्त्री हरदास हे नाव देण्यात आले आहे. राधा गोिवद चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्था यांनी या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या परिसरात तीन प्रवेशद्वार असून त्यांना प्रसिद्ध कीर्तनकाराचे नाव देण्यात आले असून कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी दिंडी काढण्यात येईल. या कीर्तन महोत्सवाला कीर्तनप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी समितीने केले आहे.
कीर्तनकार दिगंबरबुवा नाईक, आमदार विकास कुंभारे, गिरीश व्यास, विलास त्रिवेदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.