संपूर्ण कोकणपट्टीत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ५२ शाखा काम करत आहेत. यातील फक्त रत्नागिरी आणि गुहागर शाखांच्या कार्यकारिणींनी राजीनामे दिले आहेत. याचा अर्थ शाखा बरखास्त झाल्या असा होत नाही. या दोन्ही ठिकाणी लवकरच नवीन कार्यकारिणी नियुक्त केली जाईल, असे ‘कोमसाप’चे अध्यक्ष महेश केळुस्कर यांनी सांगितले. ‘कोमसाप’मधील काही मंडळींचे सभासदत्व त्यांच्या गैरवर्तनासाठी रितसर चौकशी करून रद्द करण्यात आले आहे. अशी मंडळी बाहेर पडली तरी ‘कोमसाप’चे काहीही नुकसान होणार नाही. चिपळूण संमेलनानंतर ‘कोमसाप’ फुटण्याची अजिबात शक्यता नाही, असा दावाही केळुस्कर यांनी केला. ‘लोकसत्ता’च्या २७ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘कोमसाप फुटीच्या उंबरठय़ावर’या वृत्ताविषयी केळुस्कर यांनी उपरोक्त माहिती दिली.