टायगर सफरीसाठी मध्य प्रदेशात गेलेल्या उत्तर कोरियातील तरुणीवर बलात्कार झाल्याचे गुरुवारी औरंगाबादेत दुभाषकाच्या मदतीने स्पष्ट झाले. क्रांती चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून मध्य प्रदेशात तो हस्तांतरित करण्यात आला.
बलात्कार झाला, ते ठिकाण मध्य प्रदेशच्या उमारिया जिल्ह्य़ातील असून बांधवगड राष्ट्रीय उद्यानाच्या येथील हॉटेल ‘जंगल इन’मध्ये ही तरुणी थांबली होती. तेथे हॉटेलमालकाच्या मुलाने बलात्कार केल्याची तक्रार क्रांती चौक पोलिसांत दाखल करण्यात आली. ‘जंगल इन’ हॉटेलमालकाच्या मुलाने हे कृत्य केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी दिली. पर्यटनासाठी इंदूर येथे गेलेल्या या २४ वर्षीय तरुणीला इंग्रजी भाषा जेमतेम समजत होती. त्यामुळे झालेला अन्याय तिला सांगता आला नाही. औरंगाबाद जिल्ह्य़ात खुलताबाद येथे अन्य कोरियन भाषा अवगत असलेल्या तरुणाला तिने आपल्यावरील अत्याचाराची कहाणी सांगितली.