माजी उपनगराध्यक्ष कृष्णा तथा भाऊ जाधव यांचे काल पहाटे आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून भाऊ जाधव आजारी होते. उपचारासाठी त्यांना पुणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, नगरसेवक दोन भाऊ, धनंजय व वकील दिनानाथ अशी दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सकाळी जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
सन १९७२ ते २००३ असे तब्बल २१ वर्षे कृष्णा जाधव नगरसेवक होते. नगरपालिका व महानगरपालिका अशा दोन्ही सभागृहांत त्यांनी काम केले. सन ८७-८८ या काळात तत्कालीन नगरपालिकेत ते उपनगराध्यक्ष होते. अभ्यासू नगरसेवक अशीच त्यांची ख्याती होती. त्याच्याच जोरावर त्यांचा प्रशासनातही दरारा होता. तोफखाना या शहरातील मध्यवस्तीतील भागाचे त्यांनी प्रदीर्घ काळ प्रतिनिधीत्व केले. केवळ प्रभागच नव्हे तर शहरातील विविध प्रश्न त्यांनी धसास लावले. जिल्हा तालीम संघासह विविध सामाजिक संस्थांवरही ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. दुपारी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.