अग्निशमन दल अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज करण्याच्या घोषणा नेहमी केल्या जातात. मात्र या दलातील जवानांना गेल्या अनेक वर्षांत साधा गणवेशही मिळालेला नाही. अत्यावश्यक आणि अगदी लहानसहान बाबींमध्येसुद्धा होणाऱ्या या अन्यायामुळे अग्निशमन दल धुमसू लागले आहे. येत्या १ मेपर्यंत गणवेश मिळाला नाही तर २ मेपासून घरगुती कपडय़ांमध्येच कामावर जाऊ, असा इशारा अग्निशामकांनी दिला आहे. परंतु अग्निशमन दलाबाबत नाकर्तेपणा एवढा आहे की हा इशारा दिल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
अग्निशमन दलातील जवानांना २००९ आणि २०११ मध्ये ‘डेली यूज वूलन’ हा गणवेश देण्यात आलेला नाही. याबाबत वेळोवेळी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. गणवेश देण्याची तयारीही अधिकाऱ्यांनी दर्शविली. मात्र प्रत्यक्षात आजतागायत अग्निशामकांना गणवेश मिळालेला नाही.
आतापर्यंत न मिळालेल्या गणवेशाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या वेतनात जमा करावेत आणि अग्निशामकांना २०१३-१४मध्ये गणवेश देण्यासाठी मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करून संबंधितांकडे प्रस्ताव पाठवावा, असे आदेश त्यावेळी खातेप्रमुखांना देण्यात आले होते. ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेन्ट’बाबतही असेच घडले. मात्र त्यावर अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही.
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अग्निशामकांना जीर्ण होत चाललेला जुना गणवेश परिधान करून कर्तव्यावर जावे लागते. जीर्ण गणवेशामुळे जवान जखमी होण्याचा धोका असतो. मात्र आता १ मेपर्यंत जवानांना गणवेश देण्यात आला नाही, तर ते घरच्याच कपडय़ांमध्ये कर्तव्यावर जातील. आग विझविताना अथवा अन्य दुर्घटनेत बचावकार्य करताना जवान जखमी झाल्यास त्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर राहील, असा इशारा मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेने दिला आहे. या संदर्भात कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठविल्याची माहिती मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शरद कुवेसकर यांनी दिली.

‘डेली यूज वूलन’ गणवेश
ब्रिटिश काळापासून दुर्घटनेची वर्दी मिळताच ‘डेली यूज वूलन’ गणवेश परिधान करून अग्निशमन जवान दुर्घटनास्थळी धाव घेतात. अग्निरोधक असलेल्या ‘डेली यूज वूलन’मध्ये वूलनचा जांभळा शर्ट, पॅन्ट, बनियन, पायमोजे, टोपी आदींचा समावेश असतो. या गणवेशामुळे अधिक तापमानात मदतकार्य करताना त्रास होत नाही. दरवर्षी अग्निशमन दलातील जवानांना हा गणवेश दिला जातो. मात्र गेली तीन वर्षे हा गणवेश देण्यात आलेला नाही. तसेच कार्यक्रमाच्या वेळी वापरला जाणारा टेरेमनी गणवेशही अग्निशामकांना दोन वर्षांपासून मिळालेला नाही. अग्निशमन दलातील जवान अधिक सुरक्षित राहावेत म्हणून ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेन्ट’ हा अद्ययावत गणवेश देण्याची घोषणा प्रशासनाने केली खरी; पण जवानांना केवळ एकदाच हा गणवेश मिळाला. या गणवेशात अधिक तापमानात काम करणे शक्य होते. २०१० पासून हा गणवेशही अग्निशामकांना मिळालेला नाही.