पतीबरोबर बारबालाचे असलेले अनैतिक संबंधाला कंटाळून पळस्पे येथील अपर्णा भोईर या महिलेने केलेल्या आत्महत्येनंतर पनवेलमधील लेडीज सव्‍‌र्हिस बारचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. येथील लेडीज सव्‍‌र्हिस बार बंद करण्याची मागणी करूनही ते बंद होत नसल्याने पनवेलकरांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र या आवाहनाला पुन्हा एकदा साद घालण्यात येत आहे. पनवेल तालुक्यात मोठय़ा प्रमाणात प्रकल्पग्रस्त राहत आहेत. विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या येथील ग्रामस्थांना आता येथील बार संस्कृतीने छळण्यास सुरुवात केली आहे. पनवेलमध्ये एकूण २३ लेडीज बार आहेत. या बारमध्ये वेश्याव्यवसाय चालतो, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. प्रत्येक लेडीज बारच्या शेजारी लॉजची सोय आहे. लॉज नसेल तर छुप्या शयनकक्षाची सोय बारमध्येच करण्यात आली आहे. बारवर पडणाऱ्या धाडीत बारमध्ये अनैतिक प्रकार चालतात हे पोलिसांनी उघड केले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडय़ात याच प्रश्नी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल पंचायत समितीचे सदस्य नीलेश पाटील यांनी तालुक्यातून लोकवस्ती, धार्मिक स्थळे, विद्यालये असलेल्या ठिकाणचे लेडीज बार बंद करण्याची मागणी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्याकडे केली आहे. त्यावर अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही. कोन या एकाच गावात नऊ लेडीज बार आहेत. तसेच या बारकडे तरुणवर्ग मोठय़ा प्रमाणात ओढला जात आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता येथील कौटुंबिक व्यवस्था बिघडत चालली आहे.

हॉटेलच्या नावावर लेडीज बार
ज्या लेडीज बारना ग्रामपंचायतींनी ना हरकत परवाने दिले. ते परवाने लेडीज बार नव्हे तर हॉटेलच्या नावावर देण्यात आले आहेत, परंतु हॉटेलच्या नावावर परवाने काढून लेडीज बार सर्रासपणे येथे चालविले जात आहेत. हॉटेल ग्रामस्थांचा विरोध नाही परंतु हॉटेलच्या नावाखाली सध्या सुरू असलेल्या लेडीज बारना ग्रामस्थांचा विरोध आहे. तर दुसरीकडे जादा रकमेचे भाडे मिळत असल्याने काही ग्रामस्थांनी या बारना आश्रय दिला आहे. बार संस्कृतीने सामाजिक समानता ढासळत चालली असून हे बार बंद करण्यात यावेत, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

‘पप्पाला, त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला जायंच होत आणि आई रोखायची..’
पप्पाला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला जायंच होत आणि आई त्यांना रोखायची म्हणून ते भांडण करायचे, अशी साक्ष मंगळवारी गळफास लावलेल्या अपर्णा भोईर यांच्या पाच वर्षांची मुलगी सीमरण हिने दिल्याने अपर्णाचे नातेवाईक व पोलीसही सून्न झाले. या साक्षीवरुन अपर्णाचा पती सूरज भाईर याच्याविरुद्ध मानसिक, शारीरिक छळ करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे असे गुन्हे पनवेल पोलिसांनी दाखल करण्यात आले आहेत.
सूरज हा पळस्पे गावचे माजी सरपंच चंद्रकात भोईर यांचा पुत्र आहे. सात वर्षांपूर्वी पदवीचे शिक्षण घेत असताना देवळोली गावातील अपर्णा पाटील हिच्याशी त्याचा विवाह झाला. अपर्णाचे एम.फीएलपर्यंत शिक्षण झाले होते. सूरव व अपर्णा यांना पाच वर्षांची मुलगी सीमरन आणि चार महिन्यांचा मुलगा अशी दोन मुले आहेत. अपर्णा या गरोदरपणासाठी मोहरी गेल्यानंतर सूरजचे आणि बारबालेशी संबंध वाढले होते, असे चौकशीत सूरजन सांगितले. मुलगी सीमरन व तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनूसार सूरज हा त्याची प्रेयसी बारबालेला भेटण्यासाठी जाताना रात्री अपर्णा व मुलांना घरात कोंडून जात होता. यावेळी सूरज तिला मारहाणही करीत असे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पनवेलमधील लेडीजबारने अपर्णासारख्या अनेक तरुणींचे संसार उद्धवस्त केले. काही तरुणांची जिवनयात्रा यामध्ये संपली तर काही तरुण याच लेडीजबारमुळे करोडपतीवरुन रोडपती झाले तरीही तालुक्यात नवीन लेडीजबारना परवानगी देण्याचे सत्र सुरूच आहे, याबाबत तीव्र असंतोष ग्रामस्थांच्या मनात खदखदत आहे.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies bar issue in navi mumbai
First published on: 28-05-2015 at 07:45 IST