लग्न, प्रेमसंबंध, नातेसंबंध या विषयावर मराठी-हिंदीत वरचेवर चित्रपट येत आहेत. खासकरून आजच्या पिढीच्या तरुण-तरुणींची लग्नसंस्था, मैत्री, नाते, प्रेम याविषयीची मते व्यक्त करणारे हे चित्रपट आहेत. ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटात पत्रिका पाहून लग्न करणे आणि पत्रिका न पाहता एकमेकांना अनुरूप असलेल्या वधुवरांनी लग्न करणे अशा दोन मतप्रवाहांचा गमतीदार संघर्ष समर्पक पद्धतीने मांडला आहे.
निशांत बर्वे हा पुण्याचा लग्नाळू अमेरिका रिटर्न तरुण आहे. लग्न करून पुन्हा अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याचे त्याने ठरविलेय. अमेरिकेतला वर म्हटल्यावर वधुपक्षाकडून भरपूर मागणी या वराला आहे. निशांतच्या आईने पत्रिका पाहून त्याचे लग्न जुळवलेय. पण अमेरिकेतील त्याची नोकरी जाते आणि म्हणून लग्न मोडते. हे लग्न मोडण्याच्या दरम्यान निशांतला अदिती टिळक भेटते. सतत नवीन नवीन उद्योग-व्यवसाय करण्याचे प्रस्ताव ठेवून भांडवल मिळविण्याच्या खटपटीत असलेली अदिती आणि निशांत एकत्र येऊन आगळावेगळा व्यवसाय करतात. पत्रिका पाहून लग्न जुळविणारी, पत्रिकेत दोष असेल तर रत्ने देऊन ते दोष दूर करणारी नलूताई ही सुप्रसिद्ध ज्योतिषी असूनही निशांतचे लग्न मोडते. अदितीच्या डोक्यात मुलामुलींची अनुरूपता पाहून नव्या पद्धतीने वधु-वर सूचक मंडळ चालविण्याची कल्पना सुचते. निशांत तिला मदत करतो. आणि मग सुरू होतो दोन विचारांचा, मतप्रवाहांचा गमतीदार संघर्ष.
पत्रिका जुळवून दोन अनोळखी तरुण-तरुणींनी लग्न केले तरी अनेक संकटे येतात, लग्न मोडतात आणि प्रेमविवाह करूनही लग्ने मोडतात, घटस्फोट होतात हे समाजामध्ये सगळेचजण पाहतो. अनुरूपता पाहून, एकमेकांचा आदर बाळगून वागणे आणि समंजसपणे दोघांचे पटले तर लग्न करणे किंवा प्रेमविवाह करणे यामध्येही लग्न मोडण्याचे प्रमाण असतेच, संकटेही असतातच. दिग्दर्शकाने हे दोन मतप्रवाह प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. परंतु, त्यामध्ये कुठलाही एक मतप्रवाहच योग्य आहे असे विधान केलेले नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि दैनंदिन जगण्यातील माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नातेसंबंधांवर, लग्नसंस्थेवर अनेक चांगले-वाईट परिणाम होत आहेत, त्याची उदाहरणे समाज पाहतोय. त्यामुळे वास्तविक दिग्दर्शकाने भाष्य करणे अपेक्षित होते. परंतु, हलक्याफुलक्या पद्धतीने तरुण प्रेक्षकांना आवडतील अशा संवादांची पेरणी करत दिग्दर्शकाने दोन मतप्रवाह समोर ठेवले आहेत आणि निर्णय प्रेक्षकांवर सोपविला आहे.
निशांतच्या भूमिकेतील उमेश कामत आणि अदितीच्या भूमिकेतील मुक्ता बर्वे यांनी भूमिकांना न्याय मिळेल असा अभिनय केला आहे. मुख्य कथानक गमतीदार संघर्षांचे असले तरी प्रेमकथाही त्यात आहेच. त्यामुळे ही प्रेमकथा चांगली संगीतमय दाखविण्याचा चांगला प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. अदिती-निशांतच्या कंपनीतर्फे ज्यांचे लग्न जुळते ते आनंदी आणि राहुल यांच्या भूमिका अनुक्रमे तेजश्री प्रधान आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी साकारल्या आहेत. ‘फिल्मी’ राहुल सिद्धार्थ चांदेकरने झकास साकारला आहे तर तेजश्री प्रधाननेही आपली भूमिका चांगली वठवली आहे.
एकीकडे आनंदी-राहुलचे नाते दाखविताना त्यामध्ये अदिती-निशांत यांचे नाते खुलत जाते, ते एकमेकांकडे व्यक्त होतात ही कथानकातील गुंफण लेखकद्वयींनी बेमालुमपणे केली असून त्याची सहजसोपी पण परिणामकारक मांडणी करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. नलूताई या भूमिकेद्वारे करारी, कर्मठ ज्योतिषी ही व्यक्तिरेखा साकारतानाचा स्वाती चिटणीस यांचा अभिनय अप्रतिम आहे. खुसखुशीत, चटपटीत संवाद आणि कलावंतांचा अभिनय आणि चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना यामुळे चित्रपट परिमणामकारक ठरतो. बरेच काही सांगूनही जातो.
लग्न पाहावे करून
कथा-संगीत-दिग्दर्शन – अजय नाईक
पटकथा- संवाद – क्षितीज पटवर्धन, समीर विद्वांस
छायालेखक – अभिजीत आबदे
कलावंत – स्वाती चिटणीस, उमेश कामत, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर, तेजश्री प्रधान, जयंत सावरकर, मानसी मागीकर,
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2013 रोजी प्रकाशित
गमतीदार संघर्ष
लग्न, प्रेमसंबंध, नातेसंबंध या विषयावर मराठी-हिंदीत वरचेवर चित्रपट येत आहेत. खासकरून आजच्या पिढीच्या तरुण-तरुणींची लग्नसंस्था
First published on: 05-10-2013 at 11:04 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lagna pahave karun interesting conflict