श्रमिक एल्गाराने मूल येथे नियमबाह्य़रित्या जागा बळकावल्याचा गंभीर आरोप मूलचे माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे यांनी पत्रकार परिषदेत केला. जवळपास दहा हजार चौरस मीटर असलेल्या या जागेचे बाजारमूल्य आज ५० लाखांच्या घरात आहे.
 मूल नगर पालिकेच्या हद्दीतील सिद्धमशेट्टीवार ले-आऊटमधील सव्‍‌र्हे क्र. ८१२ हा खुला भूखंड होता. नागरिकांच्या वापरासाठी तो ठेवण्यात आला होता, परंतु १९९७-९८ मध्ये हा भूखंड श्रमिक एल्गारचे महासचिव विजय सिद्धावार यांच्या प्रबोधिनी या संस्थेने बळकावला. यासाठी पालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून ठराव घेतला तेव्हा मूलचे नगराध्यक्ष संतोषसिंग रावत होते. त्यांनी स्थायी समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता ठराव घेतला. तत्पूर्वी, सभेची नोटीस स्थायी समितीच्या सदस्यांना देण्यात आली. त्यात सव्‍‌र्हे क्र. ८१२ ची जागा प्रबोधिनी संस्थेला देण्याबाबतचा विषय सूचीत नव्हता. त्याउपरही प्रबोधिनी संस्थेला जागा देण्याचा ठराव १९ जून १९९८ पारित केला गेला, मात्र बेकायदेशीर ठरावाच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी भोगे यांनी रावत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यात सव्‍‌र्हे क्र. ८१२ मधील खुली जागा विनामूल्य मूलच्या प्रबोधिनी संस्थेला कोणतीही चौकशी न करता, शासनाची पूर्वपरवानगी न घेता दिली आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा केली.
त्यानंतर मूल पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी टी. जी. खोब्रागडे यांनी १२ ऑगस्ट २००२ रोजी या कारणे दाखवा नोटीसचे उत्तर दिले. यात प्रबोधिनी संस्थेला जागा दिली आहे. त्या जागेवर एल्गार सक्षम महिला केंद्राची इमारत आहे. ही जागा नगर परिषद अधिनियमातील तरतुदीनुसार बहाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा ठरावच रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या उत्तरात केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सखोल चौकशीच करण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जागा बेकायदेशीररित्या दिली असल्याची कबुली दिली होती. त्याउपरही कारवाई झाली नाही. प्रबोधिनी संस्थेने बळकावलेल्या जागेवर श्रमिक एल्गारची इमारत उभी झाली. आता या ठिकाणी पतसंस्था सुरू आहे. त्याच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी होत्या. गोस्वामी या गोरगरीब जनतेसाठी लढण्याचा दावा करतात. मग त्यांना नागरिकांच्या हक्काची जागा बळकाविण्याची गरज का पडली, असा सवाल यावेळी बोकारे यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव असल्यामुळे ते कारवाई टाळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला युवक बिरादरीचे कवडू येनप्रेडीवार, मूलचे माजी नगराध्यक्ष वासुदेव लोनबले, विशेष कार्यकारी अधिकारी वासुदेव उमरकुंडावार आदींची उपस्थिती होती.