अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर ‘लोकसत्ता’ ने पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. विद्यार्थी, गृहिणी, रिक्षाचालक, बसचालक, भाजीविक्रेते, डॉक्टर, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘उशिरा का होईना, पण सरकारने योग्य निर्णय घेतला,’ अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कसाबला फाशी देण्यात आली याबद्दलही अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. कसाबवर आजपर्यंत करण्यात आलेल्या खर्चावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कसाबला फाशी दिल्यामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. प्रातिनिधिक स्वरूपातील काही प्रतिक्रिया..
गिरीश काळे (रिक्षाचालक) – सरकारने कसाबच्या बाबतीत निर्णय देण्यात थोडा उशीरच केला पण, जो निर्णय दिला तो कायद्याच्या चौकटीत राहून दिला. कसाबलाही स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती. त्यामुळे आपल्या न्याय व्यवस्थेवर कुणीही बोट ठेवू शकणार नाही. इतर खटल्यांच्या तुलनेत या खटल्याचे स्वरूप पाहता कसाबच्या फाशीचा निर्णय लवकरच झाला आहे.
डॉ. अतुल लिमये –  शहीद जवान आणि प्राण गमावलेल्या नागरिकांसाठी ही योग्य श्रद्धांजली आहे. आज खरी दिवाळी आहे. भारतीय सरकारने उत्तम गुप्तता पाळली. दुर्दैवाने त्याला कारागृहातच दफन केल्याने ते मात्र अपवित्र झाले आहे.
सविता उपरे (गृहिणी) – कसाबला फाशी दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन! यापुढे देशात दहशतवादी कृत्ये घडू नयेत म्हणून आता प्रत्येकानेच सतर्क राहणे गरजेचे आहे. आपली लोकसंख्या जास्त आहे आणि पोलीस कमी आहेत, अशा वेळी पोलीस किती ठिकाणी पुरे पडणार?
रेखा यादव (सुरक्षा रक्षक) कसाबसारख्या गुन्हेगाराला फाशीचीच शिक्षा योग्य आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे आज कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्याच्या फाशीमुळे इथे न्याय मिळतो यावरचा विश्वास वाढला आहे.
अक्षय गोखले (विद्यार्थी) –  कसाबला देण्यात आलेली फाशी २६/ ११ च्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. कसाबला फाशी देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही सरकारने श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर भारतही खंबीर पावले उचलू शकतो याचा जगाला धडा मिळेल अशी आशा आहे.
काका खेवट (दुकानदार)-  कसाबला बाळासाहेब ठाकरे असताना फाशी दिली असती, तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असती. फाशी देण्याच्या प्रक्रियेला वेळ लागला असला तरी सरकारने ही प्रक्रिया योग्यरीतीने पार पाडल्यामुळे या जगात आज कुणीही आपल्यावरती बोट ठेवू शकत नाही.
शिवांजली झाडबुके (विद्यार्थिनी)-  फाशी दिली हे चांगलेच झाले. मात्र, पोलिसांच्या वर्षभराच्या पगारापेक्षा जास्त खर्च त्याला सोयीसुविधा पुरवण्यासाठी करण्यात आला तो मात्र अनावश्यक आहे. आता अफजल गुरूच्या फाशीचीही मागणी करता येईल.
स्वाती जोशी (गृहिणी) – कसाबला फार पूर्वीच फाशी द्यायला हवी होती. निर्णय घ्यायला उशीर झाला; पण ठिक आहे. आज खऱ्याअर्थाने नरकचतुर्दशी आहे. उशिरा का होईना पण त्याला फाशी दिल्याबद्दल सरकारचे आभारच मानायला हवेत.
प्रशांत लोटके (इंजिनिअर)- कसाबला फाशी होणे गरजेचे होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फाशी देणेच योग्य होते. त्याप्रमाणे वेळ लागला तरीही आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या ते योग्यच केले.
श्रुतिका साळी (विद्यार्थिनी) – कसाबसारख्या गुन्हेगाराला फाशी द्यायला चार वर्षे जरा जास्त होतात. सरकारने फाशी द्यायला फार विलंब केला. लोकशाही असलेल्या देशामध्ये प्रजेची मतं आणि भावना विचारात घेतल्या गेल्या नाहीत. सरकार स्वतच्या मनाप्रमाणे वागत राहिले.
उज्वला पोळ (कार्यकारी निर्माता)- कसाबसारखी माणसं आपल्यामध्ये येतात, राहतात, गुन्हे करतात वर चार वर्ष आरामात जगतात हे किंबहुना आपल्यातलं देशप्रेम कमी पडत असल्याचं द्योतक आहे असं वाटतं. याबाबत प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.
नारायण अवेरे (भाजीविक्रेते) –  कसाबला फाशी दिली तशी अफजल गुरूलाही फाशी देण्यात यावी. देशद्रोही गुन्हेगारांबाबत राजकारण न करता देशात पकडल्या गेलेल्या प्रत्येक दहशतवाद्याच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा. जेणेकरून एखादा दहशतवादी भारतात येण्याआधी दहा वेळा विचार करेल.
चंदू पवार (रिक्षाचालक)- त्याला फाशी देऊन सरकारने खूप चांगले पाऊल उचलले. भारतातही गुन्हेगारांना कडक शिक्षा केली जाते, हे आता जगालाही दिसून येईल. मात्र, कसाबला पोसताना जनतेचा कोटय़वधी पैसा वापरला गेला याची सरकारने जाण ठेवावी आणि यापुढे असे निर्णय वेळेवर घ्यावे.
प्रियदर्शन सहस्रबुद्धे – कसाबला फाशी दिली हे योग्य आहे. मात्र, दहशतवाद रोखण्यासाठी या मार्गाचा वापर करावा लागला याबाबत खंत वाटते. ज्या प्रकारची गोपनीयता राखली व माध्यमांमध्ये हा वाद चिघळू दिला नाही यासाठी सरकार, पोलिसांचे कौतुक वाटते.
गुलाम सय्यद, (बस चालक) – कसाबला फाशी दिली ही खूपच चांगली गोष्ट आहे. सरकारने त्याला फाशी देण्यात खूप उशीर केला आहे. परंतु आता संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूच्या बाबतीतही लवकरात लवकर योग्य निर्णय सरकारने घ्यावा.
अमित सोनवणे (प्राध्यापक)- अजमल कसाबला फाशी दिल्याची बातमी समजल्यानंतर आनंद झालाच पण हा निर्णय घ्यायला उशीर झाला, असे वाटते. चार वर्षे त्याला सांभाळण्यापेक्षा अगोदरच फाशी द्यायला हवी होती. भारतातील न्यायालयीन प्रक्रिया खूप किचकट स्वरूपाची असल्याने अफजल गुरूला फाशी कधी देणार, हा पुढील प्रश्न आहे. दहशतवाद्यांपासून धोका असल्याने सरकारने कारवाईबाबत अतिशय गुप्तता बाळगली हे योग्यच होते.
गणेश पताळे (फळविक्रेता, मंडई)  – कसाबला दिलेली फाशी ही जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना दिली गेली असती तर आनंद झाला असता. आता अफजल गुरूच्या बाबतीतही सरकारने निर्णय घ्यावा.
दत्ता कोळेकर (कंडक्टर ) – खूप बरं वाटतंय..! भारताने सुरक्षिततेच्या नावाने इतक्या दिवसांपासून सांभाळलेल्या पाहुण्याला ‘कसाबला’ आज चार वर्षांनी फाशी दिली हे सरकारचं शहाणपणच म्हणावे. कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही आनंदाने स्वागत करतो.
शिवाजी ढेबे  (उपाहारगृह कर्मचारी) -कसाबच्या फाशीची बातमी ऐकून खूप आनंद झाला. झाले ते योग्यच झाले. या आधीच त्याला फाशी द्यायला पाहिजे होती. बातम्यांमध्ये कसाबविषयी ऐकले की सरकारचा खूप संताप यायचा पण सकाळी ही बातमी ऐकून उशिरा का होईना सरकारला जाग आली याचा आनंद झाला.
अरविंद भट (निवृत्त बँक अधिकारी) -कसाबसारख्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होणारच होती. मात्र, आपल्याकडे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये खूप वेळ जात असल्याने सर्वसामान्य व्यक्तीला न्याय उशिरा मिळतो. कसाबच्या शिक्षेच्या बाबतीतही उशिराच न्याय मिळाला आहे, असे म्हणावे लागेल. कदाचित अमेरिकेने लादेन विरोधात केलेल्या कारवाईपासून भारत सरकारने प्रेरणा घेतली असावी. या कारवाईबाबत गुप्तता बाळगणे योग्यच होते.
अद्वैत चोथवे (नोकरदार) – कसाबला फाशी देऊन सरकारने योग्य कारवाई केली आहे. भारतात कायद्याचे राज्य आहे हे या घटनेने दाखवून दिले असून अफजल गुरूच्या बाबतीतही हा न्याय व्हावा हीच अपेक्षा आहे. या कारवाईनंतर दहशतवादी कारवायांना नक्कीच आळा बसेल.
नामदेव पवार  (विद्यार्थी) – कसाबच्या फाशीची इतके दिवस वाट पाहावी लागली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. केवळ फाशी देऊन दहशतवादाचा प्रश्न सुटणार नाही. दहशतवादावर उपाय शोधणे गरजेचे आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा सक्षम बनवली पाहिजे, तसेच पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे व यंत्रणा पुरवली पाहिजे. कसाबवरील खटला चालवण्यात जनतेचा पैसा खर्च झाला आहे, याआधीच फाशी दिली असती तर हा पैसा तरी वाचला असता.
संतोष पंढरी  (व्यावसायिक)-  सरकारने फाशी देण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला. मात्र, इतकी वर्ष कारागृहात ठेवून लोकांचा पैसा खर्च का केला? अटक केली तेव्हाच फाशी द्यायला हवी होती. फाशी देणार हे जाहीर करायला हवे होते.
दिनेश राजपरकोरा (विद्यार्थी)-  आपल्या देशात खटल्यांचे निकाल लागतात का, हाच मोठा प्रश्न आहे. हाच कसाब अमेरिकेत सापडला असता तर अमेरिकेने सद्दाम हुसेनसारखे त्याला केव्हाच फासावर लटकविले असते. हे आपण का नाही करू शकत?   
नितीन धायरकर (कलाकार) – अफजल गुरूच्या तुलनेत कसाबच्या बाबतीत लवकरच निर्णय झाला असे वाटते. ही कदाचित निवडणुका जवळ आल्याची खूण असावी.
अमर गावडे (औषधविक्रेते)-  कसाबला फाशी दिली हे चांगले झाले. परंतु पुढाऱ्यांच्या राजकीय स्वार्थामुळे ती बरेच दिवस लांबली. खरतरं या आधीच त्याला फाशी द्यायला हवी होती.
अंकुश अगरवाल (व्यावसायिक)-  जोपर्यंत या हल्याच्या मास्टरमाईंडला शिक्षा होत नाही तोपर्यंत शहिदांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली मिळणार नाही. यासाठी सरकारने कडक पावले उचलायला हवीत.
अभिषेक मगर (विद्यार्थी) – सरकार त्या मानाने लवकरच जागे झाले असं म्हणावं लागेल. योग्य पावले उचलली. जी गोपनियता पाळण्यात आली ती देखील योग्य होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तणाव, दबाव निर्माण झाला नाही.
संगीता मरगळे, (घरकामगार) – फाशी दिली ही चांगलीच गोष्ट झाली. मात्र, फाशी द्यायला इतका वेळ लागायला नको होता. लगेचच द्यायला हवी होती.
सचिन आढाव, (विद्यार्थी) – उशिरा का होईना कसाबला फाशीची शिक्षा झाल्याने शहिदांना ही एक प्रकारची श्रध्दांजली आहे. भारत सरकारचे पाकिस्तान विरोधी दहशतवादाचे धोरण स्पष्ट झाले असून पाकिस्तानला आपण चांगलाच धडा शिकवला आहे. तरीही अशा प्रकारच्या कृत्याबद्दल न्यायालयीन प्रक्रियेत विलंब न होता लवकरात लवकर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे.
शिवाजी देवकर (नोकरदार)-  कसाबला फाशी देण्याआधी त्याला आपल्या सरकारने कोटय़वधी पैसे खर्चून जे खाऊ पिऊ घातले त्याऐवजी त्याला बैलगाडीला जुंपून शेतात काम करून घ्यायला पाहिजे होते. त्यानंतर सर्व जनतेच्या देखत त्याला फाशी द्यायला हवी होती.
दिनेश पुजारी (हॉटेल व्यवस्थापक)-   अखेरीस कसाबला फाशी दिली हे योग्यच केलं. मात्र, फाशी देण्यापेक्षा त्याला जनतेमध्ये सोडायला हवे होते आणि जनतेने मारायला हवे होते.
सुदेष्णा देशमुख (नोकरदार) – ज्या प्रकारचे क्रूरकर्म याने केले आहे त्यासाठी याला फाशीपेक्षाही क्रूर शिक्षा द्यायला हवी जेणेकरून परत कोणी अशाप्रकारचे हल्ले करण्यास धजावणार नाहीत.
अनघा पांचाळ (जीम ट्रेनर) – ‘देर आये दुरुस्त आये’ हे अगोदरच केले असते तर जनतेचे कोटय़वधी रुपये तरी खर्च नसते झाले.  
मनोज शेगर (विद्यार्थी) – कसाबसारख्या नराधमाला त्याच्या कृत्याची शिक्षा दिली गेली हे उत्तम झालं. शिवाय ही कारवाई शांतता व सुव्यवस्था कायम ठेवत गुप्तरीतीने केली गेली याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन.
प्रियंका कुलकर्णी (विद्यार्थिनी) –  कसाबला लगेचच फाशी द्यायला हवी होती. चार वर्ष हा खटला चालविण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी केलेल्या खर्चाचे काय?