महाबळेश्वरातील प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉइर्ंट परिसराचे सुशोभीकरण, डागडुजीकरण तसेच मजबुतीकरण सध्या वनखात्यामार्फत युद्धपातळीवर सुरू असून खात्याने यासाठी प्रदूषणाला पूरक व या मातीशी एकरूप होणाऱ्या जांभ्या दगडाचा वापर केला आहे. वनखात्याच्या या कामामुळे आता यापुढे ऑर्थरसीट पॉईंटच्या चौफेर सृष्टी सौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकाला सुखकरपणे व सुरक्षितपणे पाहता येणार आहे.
महाबळेश्वरच्या विकासासाठी शासनाने वनखात्याला निधी उपलब्ध करून दिल्याने, तसेच सध्या वनखाते येथील बहुतांश प्रेक्षणीय स्थळांवर वनव्यवस्थापन समितीतर्फे सक्तीचा कर वसूल करू लागल्याने खात्याकडे भरपूर पैसा जमा झाला आहे. याचा वापर करून वनखात्याने येथील त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या बहुतेक सर्वच प्रेक्षणीय स्थळांची दुरुस्ती, डागडुजी, त्यांचे मजबुतीकरण करणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आदी कामे करण्याच्या तयारीला लागले आहे. तसेच या पॉईंटकडे जाणारे खराब रस्ते दुरुस्त करणे, आवश्यक असतील ते नवे करणे आदी कामे ही खात्याकरवी केली जात आहेत. यासाठी या खात्याने त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना कामे दिली आहेत. सर्व पॉईंटचा राजा म्हणून ज्याला ओळखले जाते त्या ऑर्थरसीट पॉईंटपासून याची सुरुवात केली आहे.
दिवाळी गर्दीपूर्वी वनखात्याने याच पॉईंटकडे जाणारा डांबरी रस्ता ‘सावित्री पॉईंट’पासून पुढे ‘व्हाईट टॉपींग’ या नव्या तंत्राचा वापर करून नव्याने बनविला आहे. तर, श्रीक्षेत्र महाबळेश्वरपासून ऑर्थरसीटपर्यंतचा रस्ता जेथे खराब झाला होता तेवढय़ापुरता तो दुरुस्त करण्याचे कामही केले आहे. या कामासाठी ‘व्हाईट टॉपींग’या तंत्रज्ञानातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे ‘ए. के. पाठक’ यांच्या ‘रिमीव्हीना गोल्बल कन्सल्टंन्ट’ यांना याची जबाबदारी दिली आहे. अद्यापही रस्त्याचे हे काम सुरू असून दिवाळी गर्दी ओसरल्यानंतर ते पुन्हा सुरू होणार आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल एस. एम. खोत यांनी दिली.
दरम्यान, मुख्य ऑर्थरसीट पॉईंटच्या दरी सभोवतालच्या सुमारे ३ कि.मी. परिसराची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभीकरण व सुरक्षेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम अडचणीचे, गैरसोयीचे, अवघड पण पर्यटनाच्या दुष्टीने तितकेच महत्त्वाचे असल्याने या कामातील तज्ज्ञ येथील ‘शांती कन्स्ट्रक्शनचे’ डी.एल. शिंदे, नाना शिंदे यांना हे काम खात्याने दिले. यासाठी या मातीला साजेसा व पर्यावरणाला पूरक अशा लाल जांभा दगडाचा वापर खात्याने केला आहे.
मुख्य ऑर्थरसीट पॉइंट पाहण्यासाठी तेथील वाहन तळापासून पुन्हा वाहन तळापर्यंत येण्यासाठी पर्यटकाला दरीलगत सुमारे तीन कि.मी. पायी फिरावे लागते. या रस्त्यावर ठिकठिकाणी पायऱ्या व मातीचा रस्ता आहे. पूर्वी हा रस्ता मातीची धूप झाल्याने तसेच त्याची योग्य प्रकारे डागडुजी न केल्याने खड्डामय व धोकादायक झाला होता. तसेच अनेक ठिकाणच्या पायऱ्या तुटलेल्या होत्या, काही ठिकाणच्या त्या वाहून गेल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांना प्रचंड त्रास व्हायचा. लहान मुले, वयस्कर माणसे तर पायऱ्याअभावी अनेकदा पडायची, जखमी व्हायची, मात्र त्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पहावयाचे नाही. पर्यटकही संबंधितांना शिव्या देत आपापल्या घरी परत जात असत. दरम्यान, वनखात्याने आता हा संपूर्ण ३ कि.मी.चा पायी फिरण्याचा पट्टा संपूर्णपणे नवा लाल रंगाच्या जांभ्या दगडात बनविण्याचे ठरविले आहे. या जांभ्या दगडाचे ‘पेवींग लॅटराईट’ या मार्गावर केल्याने तो अत्यंत आकर्षक व मजबूत झाला आहे.  शिवाय या पायी फिरण्याच्या मार्गावरील सर्वच पायऱ्या नव्या दगडात बनविल्याने त्या अधिक शोभिवंत तर दिसत आहेतच, पण हा पॉइंट पर्यटकांना अधिक सुखकर व सोईचा झाला आहे. ऑर्थरसीट वाहनतळ- मुख्य ऑर्थरसीट पॉईंट व पुन्हा वाहनतळ, असा हा ३ कि.मी.चा पट्टा असून या पट्टय़ात इको पॉईंट, मालकम पॉईंट, टायगर्स लीप पॉईंट, हंटींग पॉईंट व मुख्य ऑर्थरसीट, ऑर्थर विंडो असे सहा पॉईंट येत असल्याने यापुढे येथे येणाऱ्या पर्यटकाला वनखात्याच्या या कामामुळे ऑर्थरसीट दरीलगतचा सर्व पट्टा तेथील निसर्ग सौंदर्याचा आनंद सुरक्षितपणे व मुक्तपणे घेता येणार आहे. हा ३ कि.मी. चा पट्टा दरीलगत असल्याने तेथे वाहतुकीची सोय नाही. तेथील प्रत्येक गोष्टीची वाहतूक (दगड, सिमेंट, वाळूची वाहतूक) गाढवाच्याच मदतीने करवी लागत असल्याने हे काम करणे अत्यंत अवघड व जिकिरीचे आहे. मात्र या कामाचे कंत्राटदार डी.एल. शिंदे व नाना शिंदे यांनी ते पूर्णत्वाला आणले आहे. सध्या या रस्त्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू आहे. ते सुमारे १५ दिवसात पूर्ण होईल असे शिंदे बंधूंनी पत्रकारांना सांगितले. जे काम आजपर्यंत ‘कर’ घेऊनही नगरपालिका करु शकली नाही ते काम वनखात्याने यशस्वीपणे करून दाखविले, याबद्दल पर्यटकांत समाधानाचे वातावरण आहे. वनखात्यामार्फत यापुढे या पॉईंटवर दोन स्वच्छतागृहे व सुमारे सहा ते सात ‘गारबेज पीट’ बांधले जाणार असून, यामुळे आजपर्यंत पर्यटकांची येथे आल्यावरची कुचंबणा (विशेषत : महिला पर्यटकांची) यापुढे होणार नाही व नवीन कचरा पेटय़ांमुळे ऑर्थरसीट परिसर प्रदूषणमुक्त, प्लास्टिकमुक्त राहण्यास मदत होणार आहे.