लातूर महापालिकेतील सभापतींची निवड मंगळवारी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांनी जाहीर केले.
महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन पराभव पत्करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध पार पाडण्यास सहकार्य करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व रिपाइंच्या नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
बांधकाम व आरोग्य सभापतिपदी राम कोंबडे, पाणीपुरवठा सभापतिपदी रुपाली साळुंके, महिला व बालकल्याण सभापतिपदी केशरबाई महापुरे, शिक्षण सभापतिपदी रेखा नावंदर व वाहतूक, वीज सभापतिपदी असगर पटेल यांची निवड करण्यात आली.
बिनविरोध निवडीनंतर सर्वाचे पुष्पहार घालून महापौर, उपमहापौर व स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. समद पटेल यांनी स्वागत केले.
आमदार अमित देशमुख यांनी आपल्याला दिलेल्या संधीचा आपण जनतेच्या सेवेसाठी वापर करू, असे मत नवनिर्वाचित सभापतींनी व्यक्त केले.