विविध विषयांत लातूरने आपले वेगळेपण अनेकदा सिद्ध केले आहे. हृदयरोगींसाठी एकाच शिबिरात १३५जणांची अँजिओग्राफी करण्याचा देशातील विक्रम लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाने नुकताच केला.
लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात अद्ययावत कार्डियाक केंद्र सुरू झाले. केंद्राच्या परिसरातील लोकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या महिन्यापासून केंद्रात सोलापूर, हैदराबाद येथील तज्ज्ञ मंडळी रुग्णांवर उपचार करण्यास येतात. स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आठवडाभराचे अँजिओग्राफी शिबिर घेण्याची संकल्पना पुढे आली. त्यात हैदराबादचे डॉ. भारत पुरोहित, सोलापूरचे डॉ. रिजवान उल हक, सोलापूरचेच डॉ. सत्यश्याम तोष्णीवाल व लातूरचे डॉ. शीतल गटागट यांनी विनामोबदला रुग्णसेवा देण्याचा निर्णय घेतला.
विवेकानंद रुग्णालयाने परिसरातील गरजू रुग्णांपर्यंत शिबिराची माहिती पोहोचवली. शिबिरात सर्व प्रकारच्या प्राथमिक चिकित्सा, अँजिओग्राफीस लागणारे साहित्य यासाठी केवळ ३ हजार रुपये आकारले. दि. ८ जानेवारीला शिबिराचे उद्घाटन झाले, त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर उपस्थित होत्या. डॉ. रिजवान सकाळी सातपासूनच रुग्णसेवेत गर्क होते. रात्री अकरापर्यंत त्यांनी ४२ रुग्णांवर अँजिओग्राफी केली. विवेकानंदची पूर्ण टीम त्यांच्यासोबत तैनात होती.
दुसऱ्या दिवशी डॉ. तोष्णीवाल यांनीही पुन्हा सलग १४ तास देताना तब्बल ४५जणांवर अँजिओग्राफी केली. दि. १२ला डॉ. पुरोहित यांनीही पुन्हा सलग १४ तास कार्यरत राहून ५२जणांची अँजिओग्राफी केली. तीन दिवसांत १३९ गरजूंची तपासणी झाली. पैकी १५जणांवर माफक खर्चात अ‍ॅजिओप्लास्टी करण्यात आली.
विवेकानंद रुग्णालय मराठवाडय़ात सुपरिचित आहे. येथील डॉक्टर एका ध्येयाने काम करतात. ७२ वर्षीय डॉ. गोपीकिशन भराडिया आजही पंचविशीतील तरुणासारखे १२ ते १४ तास काम करतात. गेल्या २० वर्षांपासून काम करणाऱ्या डॉ. सतीश मिनियार यांनीही घडय़ाळाच्या काटय़ाकडे न पाहता स्वत:ला झोकून दिले. वेळ व पैसा याचे गणित कधी घातलेच जात नाही. विवेकानंद रुग्णालयात सोलापूर व हैदराबादहून येणाऱ्या डॉक्टर मंडळींनी रुग्णालयातील सर्वाचेच काम पाहिले व विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात योगदान दिले. कोणीही अँजिओग्राफीसाठी पैसा घेतला नाही.
सोलापूरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रिजवान उल हक यांनी सांगितले, की आजवर मधुमेह, रक्तदाब यांची मोफत तपासणीची शिबिरे होतात व उपचारही केले जातात. मात्र, ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आहे व ज्यांच्यावर उपचारासाठी पैसा नाही. अशांसाठी राज्यातील काही जिल्हय़ांत सरकारची राजीव गांधी आरोग्य योजना सुरू झाली आहे. मात्र, यात लातूरचा समावेश नाही.
लातूरमध्ये असणाऱ्या गरीब रुग्णांसाठी शहरातील सर्वात जुने, विश्वासार्ह असे विवेकानंद रुग्णालय काही चांगले करत असेल तर त्यात आपले योगदान दिले पाहिजे, या भावनेने आपण शिबिरात सहभाग घेतला. एरवी अँजिओग्राफीसाठी १० ते १२ हजार रुपये आकारले जातात. शिबिरात फक्त साहित्य खरेदीसाठीचे ३ हजार रुपये आकारले गेले. संपूर्ण देशात अशा प्रकारचे एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा संख्येत अँजिओग्राफी करणारे हे पहिलेच शिबिर झाले व त्यात योगदान देता आले हे मी भाग्यच समजतो.