महागाई, बलात्कार, बॉम्बस्फोट यामुळे देशात आज अराजकता माजली आहे. केंद्र आणि राज्य शासन यांनी तर देशाला अधोगतीकडे नेण्याचा जणू विडाच उचलला आहे. प्रस्थापित पक्षांना सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे. मात्र राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे हीच जनता एक पर्याय म्हणून पाहत आहे. त्यामुळे हा बदल घडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि जनतेपर्यंत पोहोचावे, असे आवाहन आमदार नितीन सरदेसाई यांनी केले. ते कोल्हापूर जिल्ह्य़ातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस अनिल शिदोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख स्वाती शिंदे, महिला प्रदेश उपाध्यक्षा आशा मामेडी, संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात पुणे पदवीधर मतदारसंघातून अनिल शिदोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
या वेळी आमदार सरदेसाई म्हणाले, संघटनेची घडी आता नीट बसताना दिसत आहे. नवीन पक्ष वाढत असताना प्रस्थापितांकडून पोलीस आणि प्रशासनाला धरून अन्याय होणार, हे गृहीत धरले पाहिजे. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांना जनता निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून चांगलीच लक्षात ठेवते.
अन्यायाविरोधात उसळून उठत लढण्याची प्रवृत्ती आज मनसेशिवाय इतर कोणत्या पक्षात राहिलेली नाही. बीओटी तत्त्वावर रस्त्यांची बांधणी करणे गैर नाही. मात्र रस्त्यांचा दर्जा, दुरुस्ती आणि आनुषंगिक कायदे न पाळता सुरू असणाऱ्या टोल वसुलीमुळे जनतेची लूट सुरू आहे व त्यांना पाठीशी घालणारे सरकारचे मंत्री आहेत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.
महिला प्रदेश उपाध्यक्षा आशा मामेडी म्हणाल्या, अन्याय आणि अत्याचार विरोधात जो लढतो, तोच खरा मराठा आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिरमुडीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात केलेल्या उद्रेकातून ते दाखवून दिले आहे. अनिल शिदोरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. लोकसभेबरोबरच विधानसभा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी दिवाकर पाटील, राजू मोरे, प्रसाद पाटील, राजू दिंडोर्ले, अभिजित साळोखे, मंगल शेटे आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Sep 2013 रोजी प्रकाशित
महागाई, बलात्कार, बॉम्बस्फोटांनी देशात अराजकता – सरदेसाई
महागाई, बलात्कार, बॉम्बस्फोट यामुळे देशात आज अराजकता माजली आहे. केंद्र आणि राज्य शासन यांनी तर देशाला अधोगतीकडे नेण्याचा जणू विडाच उचलला आहे.

First published on: 07-09-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawlessness in nation due to rape bomb blast and dearth sardesai