निफाड तालुक्यातील शिवरे शिवारात धुमाकूळ घालणारी बिबटय़ाची मादी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवार मध्यरात्री अडकली. बाहेर पडण्यासाटी या मादीने पिजऱ्याची फळी तोडली तसेच मोठा खड्डा केला. परंतु त्यात यश आले नाही. शिवरे येथे काही दिवसांपूर्वी बिबटय़ाची एक मादी आणि दोन बछडय़ांनी बकऱ्या व कुत्र्याची शिकार केली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यांना पकडण्यासाठी शिवरे येथे वन विभागाच्या वतीने पिंजराही लावण्यात आला होता. शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास हिरामण वाघ यांच्या विहिरीत पडून एका बछडय़ाचा मृत्यू झाला. त्यामुळे दुसरा बछडा आणि मादी आसपास असण्याची शक्यता गृहीत धरत विहिरीजवळ पिंजरा लावण्यात आला. शनिवारी रात्री दुसरा बछडा पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे मादी चिडलेली असल्याचे लक्षात घेत नागरिकांना या भागात येण्यास पोलीस व वन विभागाने मज्जाव केला. बछडा अडकलेल्या पिंजऱ्यास दुसरा पिंजरा जोडण्यात आला. रविवारी मध्यरात्री मादी दुसऱ्या पिंजऱ्यात अडकली.चिडलेल्या मादीने पिंजऱ्याची फळी पायाने तोडत जमिनीला खड्डा केला. मध्यरात्री वन कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांना आवाज आल्यामुळे त्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली. मादी पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना त्यासंदर्भात कळविले. परिसरात दुसरा बिबटय़ा असण्याची शक्यता असल्याने रात्रीच्या वेळी पिंजऱ्याजवळ  जाऊ नका अशी सूचना मिळाल्याने वन कर्मचारी सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पिंजऱ्याकडे गेले असता पिंजऱ्याजवळ मोठा खड्डा दिसला. पिंजऱ्याच्या तळाची फळी तोडलेली दिसल्याने बिबटय़ा पिंजऱ्याखालून पसार झाल्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या पिंजऱ्यातील बछडय़ाच्या संरक्षणासाठी मादी आपल्यावर हल्ला करेल या भीतीने कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यापासून दूर राहाणेच योग्य समजले. बिबटय़ा पिंजऱ्यातून पसार झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. सकाळी साडेसात वाजता वन कर्मचारी पुन्हा पिजऱ्याकडे गेले. त्यापैकी एकाने पिंजऱ्यात डोकावण्याचा प्रयत्न केला असता बिबटय़ाच्या मादीने डरकाळी फोडली. मादी पिंजऱ्यातच असल्याचे लक्षात येताच तातडीने विहिरीजवळ असलेले दगड टाकून पिंजऱ्याजवळ करण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला. वन विभागाचे डॉ. सुनील वाडेकर यांनी बिबटय़ाला बेशुद्ध करून बछडा असलेल्या पिंजऱ्यात हलविले. त्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी पंडितराव जाधव, वनपाल एम. बी. सुदिक, शेटे, सोमवंशी, पगारे यांचीही यावेळी मदत झाली.