पिंपरी पालिकेच्या वैद्यकीय विभागातील एकेक ‘उद्योग’ दररोज बाहेर येऊ लागल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. यापूर्वी सगळं करून झाल्यानंतर स्वच्छ प्रतिमा घेऊन वावरणारे काही अधिकारी आयुक्तांसमोर आपली जुनी प्रकरणे बाहेर येऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेत आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वीच वैद्यकीय विभागाचा विशेषत: यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील गैरकारभाराचा पंचनामा करणारा तक्रार अर्ज संगनमताने दडपण्यात आला. मात्र, आयुक्तांच्या तपासणीत जुने विषय उघड होत असताना त्या तक्रारीचा विषयही पुन्हा चर्चेत येऊ लागल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
‘डॉक्टर’ आयुक्तांनी पिंपरी पालिकेच्या वैद्यकीय विभागाची ‘शस्त्रक्रिया’ सुरू केली आहे. अनेक कठोर निर्णय त्यांनी घेतले असून आतापर्यंत चाललेल्या अनागोंदी कारभाराला चाप लावला आहे. वैद्यकीय विभागाचे तसेच चव्हाण रुग्णालयातील डॉक्टर जोडीचे वाभाडे काढणाऱ्या एका तक्रार अर्जाने खळबळ उडवून दिली होती. तथापि, वैद्यकीय विभागाचा तत्कालीन सर्वोच्च अधिकारी व प्रशासनातील एका बडय़ा अधिकाऱ्याने संगनताने हे प्रकरण दडपले व नंतर ही फाईल बंद केली होती. आता त्या तक्रारीची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या विशेषत नर्सेसच्या कामांचे वाटप कसे होते, त्यासाठी कोणते निकष असतात. जवळच्यांना वेगळा व इतरांना दुसरा न्याय कसा लावण्यात येतो. १५ वर्षांनंतरही बदलीचा नियम का लागू होत नाही. ठराविक मंडळींनाच वेतनवाढ कशी मिळते. काम न करता साहेब मंडळींच्या पुढे-पुढे करणाऱ्यांना गुणवंत ठरवले जाते. याशिवाय, कॅन्सर विभागातील नाटय़, ‘३२’ चे रहस्य, चौथ्या मजल्यावरचा नाष्टा, पालिकेच्या मोटारींचा खासगी कामांसाठी वापर, सुट्टीच्या दिवशी रुग्णवाहिकेच्या चालकांना सक्तीचे खासगी काम, आदी मुद्दे त्यात समाविष्ट होते. हे प्रकार सर्वज्ञात असूनही सर्वानी मूग गिळून गप्प राहणेच पसंत केले होते. मात्र, या तक्रारीने बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. बरेच दिवस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. ही तक्रार करणारी व्यक्ती अस्तित्वात नसल्याचा कांगावा करत चौकशी न करताच प्रकरण गुंडाळण्यात आले. मात्र, संबंधितांवर दबाव ठेवण्यासाठी त्या पत्राचा वरिष्ठांनी बराच वापर केला. आयुक्तांनी त्या पत्रातील मुद्दय़ांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.