भांडणाची तक्रार का दिली, या कारणावरून एकाचा घरात घुसून निर्घृण खून केल्याप्रकरणी चौघांना न्यायालयाने सोमवारी जन्मठेप व प्रत्येकी १७ हजार २५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांनी या प्रकरणी निकाल देताना सहाजणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
शहराच्या प्रभातनगर परिसरात राहणाऱ्या अनिल धुतराज याचे परिसरात राहणाऱ्या म्हात्रे कुटुंबातील एका तरुणीशी सूत जुळले होते. परंतु दोघांच्या घरच्यांचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. ९ ऑगस्ट २०१० रोजी हे दोघे पळून गेले. या प्रकारानंतर दोघांच्या कुटुंबात भांडण झाले. हे भांडण पोलीस ठाण्यात पोहोचले. म्हात्रे कुटुंबीयांनी या बाबत भाग्यनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली.
परंतु भांडणाची तक्रार पोलिसात का दिली, अशी विचारणा करीत धुतराज कुटुंबातील काही लोकांनी १० ऑगस्ट २०१० ला सकाळी दहाच्या सुमारास म्हात्रे कुटुंबीयांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. चाकू, तलवार, लोखंडी सळईने केलेल्या हल्ल्यात मारुती नारायण म्हात्रे (वय ४२) यांचा मृत्यू झाला, तर नागेश म्हात्रे गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उषाबाई म्हात्रे (वय ३५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. खून करणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, संगनमत करणे आदी आरोपांवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन निरीक्षक श्यामकांत तारे यांनी तपास करून न्यायालयात दहाजणांवर दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात एकूण बाराजणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सरकारी पक्षाचा युक्तिवाद, उपलब्ध पुरावे ग्राह्य़ मानत अतिरिक्त सत्र न्यायाधीश महाजन यांनी माधव उकाजी धुतराज (वय ४९), संतोष माधव धुतराज (वय ३२), अरुण (वय २९) व सिद्धू वैजनाथ वायवळे या चौघांना जन्मठेप व प्रत्येकी १७ हजार २५० रुपयांची शिक्षा सुनावली. याच प्रकरणातील अन्य आरोपी माधव बुक्तरे, दीक्षित धुतमल, सागर लाडके, पल्लवी लोणे, आनंद लोणे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे बी. आर. भोसले, तर आरोपींच्या वतीने अॅड. डी. के. हंडे, एस. एन. हाके, आर. एन. खांडील यांनी काम पाहिले.