घरातील भांडणाच्या कारणावरून बाप-लेकीचा खून केल्याबद्दल यातील आरोपी, मयत इसमाचा भाऊ आणि आईला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील पहिल्या आरोपीने भावाला व दुसऱ्या वृध्द महिला आरोपीने नातीला विहिरीत ढकलून ठार मारले होते.
शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील बोरूडे कुटुंबात दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. भारत बाबासाहेब बोरूडे व रंजना भारत बोरूडे या दाम्पत्याला घरातूनच त्रास दिला जात होता. रंजनाला दोन्ही मुलीच झाल्या या कारणावरून सासू पार्वती ऊर्फ मथुराबाई बाबासाहेब बोरूडे आणि दीर शरद बाबासाहेब बोरूडे हे दोघे कायमच छळत होते. या कटकटीत भारत हा नेहमीच बायकोची बाजू घेतो म्हणून त्यालाही आई व भावाकडून त्रास दिला जात होता. दि. १६ एप्रिल १० ला आरोपी मथुराबाई हिने भारत व रंजनाची छोटी मुलगी प्रांजली (वय ८) हिला तिच्या आईकडून हिसकावून घेत विहिरीत फेकून दिले. याचवेळी शरद याने भाऊ भारत याला जबर मारहाण करीत त्यालाही विहिरीत ढकलून दिले. या प्रकारात भारत व छोटी प्रांजली या दोघांचा मृत्यू झाला होता. रंजना हिने याबाबत फिर्याद दिली होती.
या खटल्याची सुनावणी नगरला दुसरे सत्र न्यायाधीश ए. एन. करमरकर यांच्यासमोर होऊन त्यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात आरोपींच्या बाजूने वेडाच्या भरात हे कृत्य झाल्याचे भासवण्यात येत होते. मात्र, आरोपींची यासंदर्भात पुणे येथे तपासणी करण्यात आली होती. त्यात दोन्ही आरोपी मानसिकदृष्टय़ा ठिक असल्याचे निष्पन्न झाले. जमिनीच्या वादातून आरोपींना या प्रकरणात गोवण्यात आल्याचाही बचाव आरोपींनी केला होता. मात्र, आरोपींचे हे दोन्ही बचाव खोडून काढण्यात आले. या खटल्यात १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारच्या वतीने वकील रमेश जगताप यांनी काम
पाहिले.