भरवशाच्या ‘मध्य नाशिक’चाही आघाडीला दणका

लोकसभा निवडणुकीत गतवेळी ज्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाने काँग्रेस आघाडीला १५ हजार मतांची आघाडी मिळवून दिली

लोकसभा निवडणुकीत गतवेळी ज्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाने काँग्रेस आघाडीला १५ हजार मतांची आघाडी मिळवून दिली, त्या मतदार संघानेदेखील यंदा महायुतीला तितकीच आघाडी देत फिट्टमफाट करून टाकली. महायुतीवर जातीयवादी प्रचाराचा आरोप आघाडीकडून होत असला तरी झोपडपट्टय़ा आणि अल्पसंख्याकांची मोठी संख्या असणाऱ्या या मतदारसंघातही आघाडीचा उमेदवार मागेच राहिल्याचे स्पष्ट झाले. या मतदारसंघावर आघाडीची मुख्य भिस्त होती. परंतु, त्यांच्याकडून आघाडीला हात दाखविला गेल्याचे लक्षात येते.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना एक लाख ८७ हजार ३३६ इतक्या विक्रमी मताधिक्याने पराभूत केले. लोकसभा मतदार संघातील इगतपुरीवगळता सिन्नर, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, नाशिक पूर्व तसेच नाशिकरोड देवळाली या सहाही मतदार संघात गोंडसेंनी लक्षणीय मते खेचली. गतवेळी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेस आघाडीला अनुकूल ठरला होता. झोपडपट्टी व अल्पसंख्याक आघाडीला साथ देतात, असे नेहमीचे गृहीतक मांडले गेले. या एकगठ्ठा मतांची बेगमी करण्याचे तंत्र वेगळेच असते. गतवेळी अनेक वादग्रस्त कारणांनी निवडणूक चर्चेची ठरली होती. याच भागातील बी. डी. भालेकर मैदानावर बोगस मतदान झाल्याची तक्रार विरोधकांनी केली होती. यंदा निवडणूक व पोलीस यंत्रणेच्या सजगतेमुळे तशा तक्रारी झाल्या नाहीत. मागील निवडणुकीत राखलेली ही एकगठ्ठा मते यंदा पुन्हा आपल्याला तारतील, असा आघाडीच्या नेत्यांचा होरा होता. गतवेळी आघाडीचे समीर भुजबळ यांना ४६, ६६५ मते मिळाली तर मनसेतर्फे निवडणूक लढविणारे गोडसे हे ३६,१६३ मतांचा टप्पा गाठू शकले होते. त्यावेळी शिवसेनेचे दत्ता गायकवाड यांना २७,५२७ मते मिळाली होती.
सर्व दृष्टीने सोयीस्कर मानल्या गेलेल्या या मतदारसंघात आघाडीचे पानिपत झाले. ज्या मतदारांवर आघाडीचा भरवसा होता, त्यांनी नेहमीप्रमाणे मतदानात उत्साह दाखविला नाही. दुपारी चार वाजेपर्यंत तर झोपडपट्टी व अल्पसंख्याक भागातील मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता. त्या उलट, उच्चभ्रू वसाहतीतील केंद्रांवर मतदारांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या. मुळात, काही विशिष्ट भागातील मतदार काही हाती पडल्याशिवाय बाहेर पडत नाही. यामुळे दुपारी उशिरापर्यंत त्या भागात कमी मतदान झाल्याचे सांगितले जात होते. चार वाजेनंतर काही मतदान केंद्रांवर गर्दी होऊ लागली. पण, म्हणावा तसा उत्साह दिसला नाही. जे मतदानाला आले, त्यांनी नेहमीपेक्षा हात कमी जड झाल्याची तक्रार केली. त्याचाही विपरीत परिणाम झाला. अपेक्षेनुसार पदरात न पडल्याने काहींनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान करून आपला संतापाला वाट मोकळी करून दिली. झोपडपट्टी भागातील मतदारांच्या व्यवस्थापनाचे कौशल्य असणारे अनेक जण आघाडीच्या दिमतीला होते. त्यामुळे एकगठ्ठा मते पदरात पडतील या भ्रमात राहिलेल्या आघाडीला मतमोजणीनंतर चपराक बसली.
या मतदार संघात आघाडीला लक्षणीय मताधिक्य मिळविता आले नाही. शिवाय आ. वसंत गीते यांच्या मतदारसंघात मनसेचे डॉ. प्रदीप पवार हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. भुजबळ यांना ५७,४२० तर डॉ. पवारांना जेमतेम १० हजार ६५६ मतांवर समाधान मानावे लागले. महायुतीने या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली. गोडसेंना ७२, ६२३ मते मिळाली. म्हणजे इतर ठिकाणप्रमाणे या मतदारसंघातही त्यांना भुजबळांच्या तुलनेत १५,२०३ मते अधिक मिळाली. या मताधिक्याने आघाडीसह मनसेचीही समीकरणे विस्कटून टाकली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksabha election

ताज्या बातम्या