महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्य़ात झालेल्या कामातील गैरप्रकार चांगलेच गाजले. मात्र, काही कर्मचाऱ्यांवर कागदोपत्री निलंबनाशिवाय वसूलपात्र रक्कम वसुलीचे प्रयत्न झाले नाहीत. कागदोपत्री ‘सर्व काही आलबेल’ असलेल्या रोहयोच्या कामाबाबत जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम उद्या (मंगळवारी) होणाऱ्या मग्रारोहयोच्या बैठकीत झाडाझडती घेणार काय, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्य़ात निवडणूक मतदारयाद्यांसाठीचे आवश्यक छायाचित्र संकलन करणे आदी कामात कुचराई केल्याने सुमारे १२ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तसेच सुमारे २०० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा कामचुकार कर्मचाऱ्यांना प्रथमच दणका बसल्याने प्रशासकीय यंत्रणेला पोयाम यांनी आपली चुणूक दाखवून दिली.
उद्या पोयाम यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासंबंधी बैठक होत आहे. बैठकीत अपूर्ण काम पूर्ण करणे, मजुरांना मजुरीचे वाटप वेळेत करणे, हजेरीपट जनरेट, मनुष्यदिवस निर्मिती, हजेरीपटावरील मोजमाप, हजेरीपटावरील खर्च, जॉबकार्ड नूतनीकरणातील त्रुटी, जॉबकार्डवरील वर्गवारी नमूद न करणे, शतकोटी वृक्षलागवडीबाबत ऑनलाइन डाटा एंट्री, ऑनलाइन तक्रारीचे निरसन आदी मुद्दय़ांवर आढावा घेण्यात येणार आहे. वसूलपात्र रक्कम व गैरप्रकारप्रकरणी पोयाम काय कारवाई करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.