धमक्या देणारे वंश निमय नरमले  ल्ल बससेवेच्या दर्जाबाबत मारामार
शहरातील स्टार बससेवा बंद करण्याबाबत नोटीस दिल्यानंतर ‘एनएमपीएल’कडून ऑपरेटरचा शोध होताच बस ऑपरेटर कंपनी वंश निमय इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडने माघार घेतली असून बसेस नियमित सुरू राहतील, असे कळविले आहे. मात्र, स्टार बससेवेबाबत प्रवासी जनतेत प्रचंड असंतोष धुमसत असून बससेवेचा दर्जा न सुधारल्यास याचा नव्याने भडका उडण्याची शक्यता आहे. पर्यायी बस ऑपरेटरसाठी मागविलेले ईओआयदेखील आता थंडबस्त्यात जाण्याची शक्यता आहे. शहर बससेवेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एल्गार’ पुकारल्याने याला राजकीय रंग मिळाले असून सत्ताधारी आघाडीतर्फे याचे कसे समर्थन केले जाते, याकडे लक्ष लागले
आहे.
बससेवाचा दर्जा आणि पूर्ण प्रक्षिशित कर्मचाऱ्यांची मारामार असतानाही वंश निमयने मागण्या पूर्ण होत नसल्याचे कारण दाखवून १ एप्रिलपासून सेवा बंद करण्याचा इशारा दिला होता. विद्यार्थी इतर तत्सम सवलती रद्द करणे तसेच वाहतूक व्यवस्थाच बंद करण्याची धमकी देणारी नोटीस वंश निमयतर्फे महापालिकेला देण्यात आली होती. याची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने इच्छुक कंपन्यांकडून ईओआय (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविले होते. शहरातील खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी एकत्रितपणे येऊन स्टारचे स्टेअरिंग सांभाळण्याची तयारी दर्शविली होती. एनएमपीएलने याचे गांभीर्य ओळखून नव्या ऑपरेटरसाठी पावले उचलून ईओआय मागविले होते. ताजकृपा सुविधा बस सव्‍‌र्हिसेस या कंपनीने ईओआय सादर करून सेवा सांभाळण्याची तयारी दाखविली होती. खुराणा आणि हंसा या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी एकत्र येऊन ही कंपनी तयार केली होती.
 भाडेवाढीसह वंश निमयच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. स्टार बसेसच्या पार्किंगसाठी दाभा येथील पीकेव्हीची ६ एकर जागा मिळण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करीत आहे. तरीही वंश निमयचे व्यवस्थापन हट्टावर अडून बसल्याने महापालिकेने कठोर निर्णयाप्रत येण्याचे ठरविले होते. प्रत्यक्षात  स्टार बससेवेबाबत प्रवाशांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. ४७० बसेसपैकी फक्त २१६ बसेस रस्त्यावर धावत आहेत. वंश निमय इन्फ्राला वाहतूक व्यवसायाचा कुठलाही अनुभव नाही, पूर्ण प्रशिक्षित चालक आणि कर्मचाऱ्यांचीही मारामार आहे. शहरात असंख्य अनुभवी खाजगी बस ऑपरेटर असताना याच कंपनीशी करार करण्यात आला, यावरच राष्ट्रवादी काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  
स्टार बस व्यवस्थापनाची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली होती. महापालिका प्रशासन त्यापुढे वारंवार झुकत होते. सद्यस्थितीत ५० टक्के स्टार बसेस धावत आहेत. तर ५० टक्के बिघडलेल्या स्थितीत आहेत. त्यांच्या नादुरुस्तीचे कारण आणि त्या दुरुस्त करण्याचा कालावधी याची कोणतीही मर्यादा ठरवण्यात आली नसून एकूण ऑपरेटरची मनमानी सुरू आहे.
शहरात धावणाऱ्या बसेसची दुरवस्था झालेली आहे. काचा फुटलेल्या, आसनांची मोडतोड झालेल्या धोकादायक अवस्थेतील बसेस आजही शहरातून धावत आहेत. जेएनएनयूआरएमच्या लोगोवर जाहिरात लावून जाहिरातीचे ५० टक्के उत्पन्न घेत असताना महापालिकेला आतापर्यंत किती रक्कम देण्यात आली आणि त्यापैकी किती रक्कम वसूल झाली याबाबतही राष्ट्रवादीने विचारणा केली आहे. मात्र, याबाबत महापालिका प्रशासन मूग गिळून बसले आहे.