मकाऊ – दक्षिण चीनच्या समुद्रातील या छोटाशा बेटावर एरवीही झगमगाट असतोच पण तो रंगीबेरंगी दिव्यांचा, कॅसिनोच्या मोहमयी दुनियेचा. रात्रभर उत्साह, आनंद ‘खेळता’ ठेवणाऱ्या या शहरातील गेल्या रविवारची रात्र मात्र मराठमोळ्या ताऱ्यांनी झळकवली. निमित्त होते, ‘मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अॅवॉर्डस २०१३’ (मिक्ता)चे. हाँगकाँगजवळचे मकाऊ हे खरे तर प्रसिद्ध आहे, फक्त इथल्या कॅसिनोजसाठीच. पश्चिमेतील लास वेगासच्या तोडीस तोड रंगत निर्माण करत मकाऊने ही स्वप्ननगरी सजवली आहे. हे शहर कधी झोपत नाही, अशी याची ख्याती आहे. पण आता भारतीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यांचे शहर अशी याची नवी ओळख बनते की काय, अशी भीती स्थानिक चिनी समाजाला वाटायला लागली आहे. कारण गेल्या वर्षीपासून एका पाठोपाठ एक भारतीय चित्रपट सोहळे तिथे रंगत आहेत. ‘आयफा’, ‘झी सिने’ आणि आता आपला मराठमोळा (हिंदी गाण्यांवर नृत्य असली तरीही) ‘मिक्ता’ सोहळा मकाऊच्याच एका रिसॉर्टमध्ये रंगला.
मकाऊतील सर्वात मोठय़ा हॉटेल्सपकी एक असणाऱ्या ‘व्हेनेशियन रिसॉर्ट’मध्ये ‘मिक्ता’चा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त या स्वप्ननगरीत मराठी जनांचा जणू मेळावाच जमला होता. महाराष्ट्रातून कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह जवळपास ३०० जण या सोहळ्यासाठी मकाऊमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे रिसॉर्टमध्ये चीनी भाषेच्या बरोबरीने मराठी आवाजही ऐकू येत होते. दरवर्षी परदेशात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते. खरे तर यंदा हा सोहळा स्वित्र्झलडमध्ये व्हायचा. पण रुपया गडगडला आणि स्वित्र्झलडमधील ‘मिक्ता’चा बेतही त्याबरोबर गडगडला. मग आयत्या वेळी हे पोर्तुगीज छापाचे चीनी शहर मराठी कलाकारांच्या मदतीला धावून आले आणि मकाऊमध्ये ‘मिक्ता’चे सूप वाजले. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून हा सोहळा सुरू करण्यात आला. यंदा सोहळ्याची धुरा तरुण पिढीने उचलायची ठरवल्यामुळे सुशांत शेलारने ही जबाबदारी सांभाळली होती. दुबई, लंडन, सिंगापूर यानंतर हा चौथा सोहळा मकाऊत झाला.
पण आधीच्या शहरांसारखा मराठी टक्का काही या स्वप्ननगरीत नाही. त्यामुळे भारतातून घेऊन गेलेल्या मोजक्या प्रेक्षकांसमोरच यंदा सोहळा रंगला. परदेशात सोहळा घेण्यामागचे नेमके उद्दीष्ट काय असावे याची मग शंका यायला लागली. केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांनी सूचना केल्याप्रमाणे पुढच्या वर्षी भारतातच सोहळा होणार की काय अशी (शंका.. भीती ?) चर्चा नंतर रंगली. पण, त्याहीपेक्षा जास्त चवीने चघळली गेली ती चर्चा म्हणजे या मायानगरीतील कॅसिनोमध्ये कुणाला किती हाँगकाँग डॉलर लागले आणि कुणाचे किती गेले याचीच..
खुमासदार नाटय़ आणि बहारदार नृत्य
‘मिक्ता’चा या वर्षीचा ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि अभिनेता नाना पाटेकर यांना देण्यात आला. जितेंद्र जोशी आणि संदीप पाठक यांची ‘नाना’ डायलॉगबाजी छान जमून आली. ‘साहेब आम्हाला तुमच्याशी बोलायचंय’, असे म्हणत सचिन खेडेकर, वंदना गुप्ते आणि अनिरुद्ध देशपांडे यांनी शरद पवार यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. सोहळ्यात खरी गंमत आणली ती पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने. हृषिकेश जोशी, मयूरेश पेम यांच्या मकाऊमधील पकाऊगिरीनेही आणखी धमाल आणली. शाब्दिक चिमटे काढत त्यांच्या मकाऊ या पोपटाने अनेकांची दांडी उडवली. भाऊ कदम यांचा चिनी निर्माताही हसवून गेला. क्रांती रेडकर आणि निलेश साबळेचा नृत्याचा ताससुद्धा लाजवाब होता. याशिवाय स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, उमेश कामत, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, उर्मिला कानिटकर, मानसी नाईक, रेशम टिपणीस, ऋजुता देशमुख, भार्गवी चिरमुले, दीपाली सय्यद, सोनाली कुलकर्णी यांनीही आपले नृत्यकौशल्य दाखविले. मोहन जोशी, भारती आचरेकर, महेश मांजरेकर, प्रिया बापट यांनी आपले गानकौशल्य दाखविले. नाटक विभागात ‘प्रपोजल’ आणि चित्रपट विभागात ‘दुनियादारी’ने बहुतेक सगळे महत्त्वाचे पुरस्कार खिशात टाकत ‘मिक्ता’वर आपली मोहोर उमटवली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Oct 2013 रोजी प्रकाशित
रंगला सोहळा असा..
मकाऊ - दक्षिण चीनच्या समुद्रातील या छोटाशा बेटावर एरवीही झगमगाट असतोच पण तो रंगीबेरंगी दिव्यांचा, कॅसिनोच्या
First published on: 06-10-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Macau marathi international cinema and theatre awards