राजमुद्रा कला अकादमीतर्फे रविवार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रवींद्र नाटय़ मंदिर महालावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गुलजार गुलछडी’ या कार्यक्रमाच्या अकराशे प्रयोगांद्वारे लावणी नृत्याची परंपरा सातासमुद्रापार पोहोचविणारे शंकर पिसाळ, रमेश भालेकर यांच्या कार्यक्रमातील लावणी नृत्यांगना ‘महालावणी महोत्सवा’त सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कार देऊन सुप्रसिद्ध अभिनेत्री-निर्माती-दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी यांना गौरविण्यात येणार आहे.
पारंपरिक लावणीसह ठसकेबाज, श्रुंगारिक, खडी आणि बैठकीच्या लावणीचे सप्तरंग प्रेक्षकांना या कार्यक्रमातून पाहायला मिळतील. संजीवनी मुळे-नगरकर, वर्षां दर्पे, आकांक्षा कदम-मोरे, वैशाली म्हसळे, देवयानी, सुजाता कुंभार, भक्ती मेस्त्री या नृत्यांगना विविध शैलीतील लावणी सादर करतील.