०  जिल्ह्यातील १३३ गावांना पुराचा फटका
०  दोन हजार घरांची पडझड
०  घुईखेड अद्याप पाण्याने वेढलेले
सलग दोन दिवसांच्या थमानानंतर पावसाने शुक्रवारी उसंत घेतली खरी, पण या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून गावकरी सावरू शकलेले नाहीत. या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. दोन हजार घरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीची पाहणी सुरू केली असून अनेक भागात पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने मदतीच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, असे निवेदन लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठवले आहे.
जिल्ह्यातील एकटय़ा वरूड तालुक्यातील २४ गावांमधील सुमारे ३०० हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. जिल्ह्यातील १३३ गावांना पुराचा मोठा फटका बसला, घरांची पडझड झाली. धामणगाव रेल्वे तालुक्यात सर्वाधिक ६४८ घरांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल वरूड ३२३, दर्यापूर २००, अमरावती १७९, चांदूर रेल्वे ६३, भातकुली ११, नांदगाव खंडेश्वर ४८, मोर्शी २६ आणि चिखलदरा तालुक्यातील तीन घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्वाधिक ७४ गावांना पुराचा फटका बसला.
जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिके उध्वस्त झाली आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते, पण नंतरच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने पीकस्थिती देखील चांगली होती, पण सप्टेंबरची सुरुवातच या पिकांसाठी जीवघेणी ठरली. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. बहुतांश भागात सोयाबीन फुलोऱ्यावर आलेले असताना पावसाचा हा तडाखा ही पिके सहन करू शकली नाहीत. सोयाबीनसोबतच कपाशीलाही या पावसाचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असले, तरी अजून अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही.
गेल्या सात दिवसात जिल्ह्यात विक्रमी २४० मि.मी. पाऊस झाला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात २९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ५६ मि.मी. पाऊस चांदूर बाजार तालुक्यात झाला. तिवसा, अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे तालुक्यातही ५० मि.मी. च्या जवळपास पाऊस झाला. शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली, पण नद्यांचा पूर मात्र ओसरलेला नाही. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
बेंबळा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील घुईखेड हे गाव गेल्या तीन दिवसांपासून पाण्याने वेढले गेलेले आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी नवीन ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, पण या ठिकाणी पायाभूत सुविधा नसल्याने गावकरी तेथे जाण्यास तयार नाहीत. जुन्याच ठिकाणी जीव मुठीत धरून राहण्याची पाळी घुईखेडवासीयांवर आली आहे. सरकारने घुईखेडवासीयांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा सरपंच उज्वला वरघट यांनी दिला आहे.