मराठवाडय़ातील ९० लघु प्रकल्पांचे काम दीड वर्षांपासून रेंगाळले आहे. केंद्राने यासाठी ५० कोटी निधी दिला तो पडून आहे. पाणीटंचाईचा आढावा घेताना या प्रकल्पांची दुरुस्ती, नूतनीकरण व पुनस्र्थापना करण्यास दिलेला हा निधी तातडीने वापरावा. तसेच पशुधन व चारा छावण्यांसाठी १५ दिवसांत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली.
पन्नासपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात टँकरचीही कमतरता जाणवणार असून, भारनियमनाच्या वेळा सांभाळत टँकरमधील पाणी भरावे लागते.
शेतकऱ्यांना तर कोणाचा आधारच राहिला नाही. रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले असल्याने सरकारने रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अशी मागणी खासदार खैरे यांनी निवेदनाद्वारे पवार यांच्याकडे केली. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचे कर्ज, तसेच वीजबिलही माफ करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
‘गाळ काढण्यासाठी यंत्रांची गरज’
तलावातील गाळ काढण्यास शेतकरी तयार आहेत. मात्र, त्यासाठी साधने लागतात. आर्थिक कारणामुळे यंत्रसामग्री उपलब्ध होत नाही. गाळ उपसा करण्याचे काम वेगाने करायचे असेल तर साधनसामग्री शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ काळे यांनी शरद पवार यांच्याकडे केली.