वारणानगर येथे खेळल्या गेलेल्या ५८ व्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे मुलींचे विजेतेपद महाराष्ट्राने तर मुलांचे विजेतेपद दिल्लीने पटकाविले. मुलांच्यात महाराष्ट्र संघास तर मुलींच्यात तामीळनाडूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर पंजाबने तिसरा क्रमांक पटकाविला.
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र यांच्या विद्यमाने वारणा सहकारी विविध शिक्षण समूहाने या स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले. आज खेळल्या गेलेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात हंसराज व सहकाऱ्यांच्या गतीमान खेळामुळे दिल्लीने महाराष्ट्रावर सुरुवातीपासून वर्चस्व ठेवीत ३४ विरुध्द २४ असा विजय मिळविला आणि स्पर्धेतील मुलांचे अजिंक्यपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने तामीळनाडूचा ६४ विरुध्द ३९ असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला. पंजाबकडून लखविंदरने २३ गुण नोंदविले.
तत्पूर्वी खेळल्या गेलेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने तामीळनाडूवर (५९-४१) तर दिल्लीने पंजाबवर (३१-१३) असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व फेरीत दिल्लीने उत्तर प्रदेशवर, महाराष्ट्राने हरयाणावर, तामीळनाडूने आयपीएससी वर व पंजाबने राजस्थानवर विजय मिळविला.
मुलींचा अंतिम सामना महाराष्ट्र व तामीळनाडू यांच्यात अतिशय रंगतदार व अटीतटीचा खेळला गेला. पहिल्या डावात महाराष्ट्राने १३ विरुध्द १० अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावातील तामीळनाडूच्या गतीमान खेळामुळे मध्यंतरापर्यंत महाराष्ट्र १५ विरुध्द २६ पिछाडीवर राहिला. तिसऱ्या डावात महाराष्ट्राने परत आक्रमक पवित्र घेत बरोबरी साधली आणि चौथ्या डावात आघाडी घेत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारीही अंतिम लढत महाराष्ट्राने ५० विरुध्द ४५ अशा ५ गुणफरकाने जिंकली आणि राष्ट्रीय अजिंक्यपद पटकाविले. महाराष्ट्राकडून कर्णधार पृथ्वी कौर व उपकर्णधार केतकी टकले यांच्यासह सर्वच खेळाडूंनी उत्कष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले, तर हरयाणाने कर्नाटकवर ५० विरुध्द २० असा विजय मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला. मुलींच्या उपांत्य फेरीत तामीळनाडूने हरयाणावर (५७-३५) व महाराष्ट्राने कर्नाटकवर (४३-३७) असा विजय मिळविला. तत्पूर्वीच्या उपांत्यपूर्व सामन्यात तामीळनाडूने दिल्लीला, हरयाणाने आयपीएससी संघास, कर्नाटकाने राजस्थान संघास तर महाराष्ट्राने आंध्र प्रदेश संघास हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
हरयाणाच्या आमदार रेणूका बिष्णोई यांच्या हस्ते व स्पर्धेचे निरीक्षक विकास पाठक व लक्ष्मीकांत भारव्दाज यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या स्पर्धा यशस्वीतेसाठी राष्ट्रीय खेळाडू उदय जाधव, स्पर्धा प्रमुख प्रा.के.जी.जाधव, उदय पाटील, सूर्यकांत माने, जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फडतारे आदींनी परिश्रम घेतले.