ग्रामीण भागात वीज मीटरची पडताळणी न करताच देयके दिली जात असून नाशिकरोडलगतच्या मोहगाव येथील जवळपास १९ शेतकऱ्यांना आलेली वीज देयके आणि प्रत्यक्षातील मीटरमधील युनिटची नोंद यात मोठी तफावत असल्याचे पुढे आले आहे. मीटरची प्रत्यक्षात पाहणी न करताच अंदाजे देयके दिली जात असून त्याचा आर्थिक फटका आम्हाला सहन करावा लागत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. संबंधितांनी देयके प्राप्त झाल्यानंतर वीज कंपनीकडे अर्ज देऊन मीटरची प्रत्यक्ष पाहणी केली असता १९ शेतकऱ्यांची देयके व प्रत्यक्ष ‘रिडिंग’ यामध्ये एक लाख ७ हजार २२६ युनिटची तफावत असल्याचे निष्पन्न झाले. या पध्दतीने वाढीव देयके आकारून वीज कंपनी शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.
सामनगावपासून जवळच असलेल्या मोहगाव परिसरात हा प्रकार घडला. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील शेतकऱ्यांना अधिक रकमेची देयके येत होती. पावसाळ्याच्या काळात कृषी पंपांचा फारसा वापर केला जात नाही. उन्हाळ्यात संबंधितांना जी देयके आली, त्याच पध्दतीने विजेचा वापर न करताही पावसाळ्यातील वीज वापराची देयके आली. यामुळे वैतागलेल्या स्थानिक शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमधील देयके हाती पडल्यानंतर ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ करण्यासाठी अर्ज सादर केले. वीज कंपनीच्या वायरमनमार्फत संबंधितांच्या मीटरची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीत मीटरवर आढळून आलेले युनिट आणि देयकात आलेले युनिट यामध्ये मोठी तफावत असल्याचे योगेश टिळे यांनी सांगितले. टिळे कुटुंबियांची या परिसरात शेती आहे. प्रत्यक्ष पाहणीत त्यांच्या शेतातील मीटरवर १८ हजार ४७७ युनिट दिसतात. वीज कंपनीने दिलेल्या देयकात मात्र हे युनिट २६ हजार २६१ दर्शविण्यात आले आहेत. याच भागातील लहानु टिळे यांच्या देयकात २१ हजार ९९१ युनिट दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्ष पाहणीत मीटरवर केवळ सात हजार ८६० युनिट दिसतात.
या पध्दतीने मोहगावामधील सुमारे २५ शेतकऱ्यांची वीज देयके आणि प्रत्यक्षात मीटरवर असणारे रिडिंग याची पडताळणी केली असता थोडी थोडके नव्हे तर, तब्बल एक लाख सात हजार २२६ युनिटची तफावत असल्याचे लक्षात आल्याचे टिळे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी सांगितले.
महावितरण शेतीसाठी अनुदानित स्वरुपात वीज पुरविते. या अनुदानाची रक्कम शासन कंपनीला देते. शासनाने शेतकऱ्यांना जी देयके पाठविली, त्याच आधारे शासनाकडून अनुदान घेतले जाते. म्हणजे प्रत्यक्षात विजेचा जेवढा वापर झाला नाही, त्याची देयके आमच्याकडून वसूल करून शासनाकडूनही अनुदान घेण्याचा वीज कंपनीचा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याचे वीज मीटर जळाले आहे. त्याचा वीज वापर बंद असताना कंपनीने युनिटच्या नोंदीसह देयक देण्याचा प्रताप केल्याचे टिळे यांनी सांगितले.
या संदर्भात शेतकऱ्यांनी सामनगाव वीज उपकेंद्रांत सर्व कागदपत्रे सादर करून तक्रार केली आहे. वाढीव देयके त्वरित कमी करून मिळावी, प्रत्यक्ष पाहणी करून देयके वितरित करावी, अशी मागणी त्यांनी केली. या बद्दल सामनगाव वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता पी. व्ही. सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय देयक विभागाशी संबंधित असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी दिलेली कागदपत्रे संबंधित विभागाकडे पाठविली जातील. त्यानंतर त्यांच्या देयकात दुरुस्ती होईल असे नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2015 रोजी प्रकाशित
महावितरणचा कारभार, शेतकऱ्यांवर अधिक भार
ग्रामीण भागात वीज मीटरची पडताळणी न करताच देयके दिली जात असून नाशिकरोडलगतच्या मोहगाव येथील जवळपास १९ शेतकऱ्यांना आलेली वीज

First published on: 03-01-2015 at 12:23 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran sending bill without taking meters reading