चोरी, दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात खरे आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आले, की हमखास पारधी वस्तीवर जाऊन धरपकड केली जाते. हे चित्र बदलण्यासाठी मुलांना शिकवून त्यांना शिक्षित करा आणि वस्तीवर आलेल्या पोलिसांना धरपकडीचे वॉरंट आहे का, कोणता गुन्हा केला, फिर्याद कोणाची आहे याचा जाब विचारा, असे आवाहन कम्युनिटी डेव्हलपमेंटचे समन्वयक शांताराम पंदेरे यांनी केले.
मानवी हक्क दिनानिमित्त दलित, आदिवासींचे हक्क व त्यांच्यावरील अत्याचारासंबंधीचे उपाय या विषयावर येथे परिसंवाद घेण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, प्राचार्य सविता शेटे, मानवी हक्क अभियानच्या उपाध्यक्षा मनीषा तोकले आदी उपस्थित होते. पंदेरे म्हणाले, की जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पारधी, भिल्ल, आदिवासी लोकांची वस्ती आहे. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्यांनाही संसार, मुले आहेत. परंतु समाजात विपरीत स्थिती आहे. पारधी समाजातील महिलांनी मुलांना शाळेत पाठवावे. त्यांना शिक्षण द्यावे. हीच मुले चांगले शिक्षण घेऊन तुमच्या वस्त्या सुधारण्यास येतील.
टाकसाळे म्हणाले, की केवळ स्वार्थासाठी समाजात भेदाभेद निर्माण केला जातो. तो टाळण्यासाठी प्रत्येक समाजातील मुला-मुलींनी शिक्षण घेणे गरजेचे आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून प्रगती करावी. सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, यासाठी शिकणे महत्त्वाचे आहे. मनीषा तोकले म्हणाल्या, की चुकीच्या पद्धतीने पारधी, आदिवासी लोकांना पोलिसांनी गुन्हेगार बनवले आहे. त्यात काहींचा मृत्यू झाल्याचे प्रकार मागील काळात उघडकीस आले आहेत.