राज्याचा आरोग्य विभाग गेल्या ५० वर्षांपासून मलेरिया निर्मूलन कार्यक्रम राबवत असून त्याला अजूनही पाहिजे तेवढे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. परंतु वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी मलेरिया होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचा दावा करीत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने १९५७ मध्ये मलेरिया निर्मूलन कार्यक्रम राबवण्याचे सर्व जगाला सांगितले होते. तेव्हापासून भारतात मलेरिया निर्मूलन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या पाच दशकात मलेरियाने मृत्यूमुखी पडणाऱ्याचे प्रमाण फारच कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असे असले तरी राज्यात दरवर्षी ५० हजांराहून अधिक नागरिकांना मलेरियाची लागण होते. त्यात एक हजार व्यक्ती मलेरियाने मृत्यूमुखी पडतात. खरी संख्या याहून अधिक राहू शकते. नागपूर विभागात १ जानेवारी २०१४ ते ३० जून २०१४ पर्यंत ५२७ जणांना मलेरियाची लागण झाली. त्यात उपचारादरम्यान ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गोंदिया २, चंद्रपूर २ आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील ७ व्यक्तींचा समावेश आहे. नागपूर ग्रामीणमध्ये मलेरियाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी.एस. पारधी यांनी दिली.
पावसाळ्यामध्ये मलेरिया, डेंग्यू हे आजार बळावतात. हे आजार डासांमुळे होत असल्याने त्यावर आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती ही महत्त्वाची ठरते. जनजागृती होत असल्यानेच मलेरिया सारख्या आजारावर नियंत्रण मिळवता आले आहे. परंतु डेंग्यू या आजारावर अजूनही नियंत्रण मिळाले नाही. त्यामुळे आरोग्य विभाग चिंताग्रस्त आहे. या आजारावरही नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे आरोग्य खात्याचे कर्मचारी हिवताप आलेल्या रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी रक्त घेतात. तेव्हा या कुटुंबातील सदस्यांना डासांपासून कसे संरक्षण करावे, याबद्दलची माहिती देतात. या मोहिमेमुळे मलेरिया आणि डेंग्यूचे आजार कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वासही डॉ. पारधी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, एका डासाचे जीवनमान फक्त तीन आठवडय़ाचे असते. परंतु या दरम्यान एक डास पंधराशे डासांची निर्मिती करतो. या डासांची निर्मिती स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे घरात किंवा आजूबाजूला पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. लहान मुलांचे शरीर झाकले जाईल, असे कपडे घालावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
जून २०१४ मध्ये जिल्ह्य़ात एकूण २६ हजार ७२७ नागरिकांचे तपासणीसाठी रक्त गोळा करण्यात आले. त्यामध्ये २१ रुग्णांना मलेरिया झाल्याचे स्पष्ट झाले. १४ जुलैपर्यंत मलेरियाचे ६ रुग्ण आढळून आले. यादरम्यान डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. २०१३ मध्ये जून महिन्यात २६ हजार २२१ नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यात ३० जणांना मलेरिया तर ४ जणांना मेंदूचा मलेरिया झाल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्यावर्षी मलेरियाने फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यावर्षी मलेरियाने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा डॉ. पारधी यांनी केला. जिल्ह्य़ातील रामटेक, काटोल आणि नरखेड तालुक्यात आणि नागपूरजवळील पाचगाव परिसरात इतर तालुक्याच्या तुलनेत मलेरियाचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येतात. मलेरियावर प्रतिबंधात्मक उपाय आहे. परंतु डेंग्यूवर अजूनही लस उपलब्ध झाली नसल्याने हमखास उपचार नाही. लक्षणे पाहूनच उपचार केले जातात. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ न देणे, हाच यावर उपाय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलेरियाच्या जंतूचा शोध
मूळचे इंग्लडचे असलेले व भारतीय आरोग्य सेवेत काम करीत असलेल्या डॉ. सर रोनाल्ड रॉस यांनी २० ऑगस्ट १८९७ मध्ये अ‍ॅनाफिलीस डासांच्या पोटात मलेरियाचे जंतू असल्याचा शोध लावला. अ‍ॅनाफिलीस जातीचा डास मलेरियाच्या विषाणूंचे संक्रमण करतो, हे त्यांनी सर्वप्रथम सांगितले होते. १९५७ पासून २० ऑगस्ट हा ‘दिवस जागतिक डास दिन’ म्हणून पाळला जातो. या दिवसानिमित्त मलेरियाचे निर्मूलन करण्यासाठी जनजागृती केली जाते. या शोधानंतर विविध शास्त्रज्ञांनी प्लासमोडियम मलेरिया, प्लासमोडियम फेल्सीपेरम, प्लासमोडियम वाइव्ॉक्स आणि प्लासमोडियम ओवेल हे मलेरियाचे चार प्रकार शोधून काढले. प्लासमोडियम फेल्सीपेरम मलेरिया हा सर्वात धोकादायक आहे. जसजसे विविध प्रकारच्या मलेरियाचे शोध लागले तसे क्लोरोक्वीन, मेफ्लोक्वीन, हॅलोफॅट्रीन, क्विनीन, आणि आरटेसुनेट ही औषधे निर्माण करण्यात आली.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaria eradication program failed
First published on: 20-08-2014 at 08:12 IST