मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी अंदाजपत्रकात तरतूद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा डाव्या आघाडीतर्फे देण्यात आला आहे. यासंदर्भात पंतप्रधानांना निवेदनही पाठविण्यात आले आहे.
शासनाने मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने या मार्गासाठी येणारा निम्मा खर्च करण्याचे याआधीच मान्य केले आहे. त्यानंतर अद्यापही कामाला सुरूवात झालेली नाही. या प्रश्नाकडे राज्य व केंद्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये मेट्रो व मोनो रेल्वे प्रकल्प राबविण्यात येत असताना इतर विभागांच्या मागण्या बासनात पडून आहेत.  शासनाच्या या धोरणामुळे प्रादेशिक विकासाचा असमतोल वाढला आहे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. लोकसभेच्या रेल्वे समितीने तत्कालीन अध्यक्ष वासुदेव कुलकर्णी यांच्या उपस्थितीत काही वर्षांपूर्वी मेळावा घेण्यात आला होता. त्यांनी धुळे-नरडाणा प्रस्तावित रेल्वे मार्गाची पाहणीही केली होती. त्
यानंतर या मार्गासंदर्भात तत्कालीन रेल्वे मंत्र्यांशी चर्चा झाली होती. या मार्गासाठी राज्य शासनाने शंभर कोटींची तरतूद केली असून काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा डाव्या आघाडीतर्फे श्रावण शिंदे, एल. आर. राव आदींनी दिला आहे.