एक प्रभावी व्यंगचित्रकार, झुंजार राजकीय वाटचाल, गाजलेल्या सभा, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती टिकविण्यासाठी उभारलेला जबरदस्त लढा व त्यासाठी घेतलेला अखंड ध्यास, बाळासाहेब ठाकरे यांच्या या सर्व वैशिष्टय़ांचा उल्लेख मनमाड शहर शिवसेना शाखेच्या वतीने येथील एकात्मता चौकात मंगळवारी आयोजित श्रद्धांजली सभेत करण्यात आला.
शिवसेनाप्रमुखांच्या भव्य पोस्टरसमोर दीप प्रज्वलन आणि फुलांची आकर्षक सजावट करणात आली होती. यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना व समस्त मनमाडकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजली वाहताना अनेकांच्या भावना अनावर झाल्याने वातावरण शोकाकूल झाले होते. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, रमाकांत मंत्री, नितीन पांडे, आदींची यावेळी भाषणे झाली
दरम्यान मनमाडच्या केंद्रीय रेल्वे कारखान्यात रेल कामगार सेनेच्या वतीने आयोजित सभेत मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे रमाकांत मंत्री यांनी बाळासाहेबाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे अशोक जाधव, प्रविण बागूल, एसीएसटी असोसिएशनचे संदीप धिवर आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना राजेंद्र भाबड यांनी बाळासाहेबांची वैशिष्टय़े मांडली. याप्रसंगी रेल कामगार सेनेचे संजय बोडखे, संदीप निकम, साईनाथ लांडगे, एजाज शेख आदी उपस्थित होते.