मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ५ ते ११ मे या कालावधीत गिरगाव येथील डॉ. अ. ना. भालेराव नाटय़गृहात दामू केंकरे स्मृती नाटय़ोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता नाटय़ोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
 नाटय़ोत्सवासाठी केंकरे कुटुंबीयातर्फे प्रायोगिक नाटय़संस्था किंवा व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून नाटय़निर्मितीसाठी एक लाख रुपये देण्यात येतात. यंदा ही रक्कम चिन्मय केळकर (पुणे) यांना देण्यात आली आहे. केळकर यांनी लिहिलेल्या ‘मनस्वाना ब्लूज’ या नाटकाचा प्रयोग पहिल्या दिवशी होणार आहे.महोत्सवात मराठीसह हिंदी आणि इंग्रजी नाटकेही सादर होणार असून संपूर्ण महोत्सवासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.  
६ मे- घोसाळकर गुरुजी, ७ मे- तारतूफ, ८ मे-द क्युरिअस क्लाईब ऑफ कटर ची’, ९ मे- कहा आ गए हम, १० मे-लेझीम खेळणारी पोरे ही सर्व नाटके सायंकाळी ६.३० वाजता होतील. ११ मे रोजी दुपारी साडेचार वाजता ज्योत्स्ना भोळे यांच्या गाण्यांवरील ‘सप्तसुरांचे चांदणे’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. याची संकल्पना आणि निवेदन अरविंद पिळगावकर यांचे आहे. मुंबई मराठी साहित्य संघ आणि धि गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.