मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रदर्शन
‘या, बाळांनो या रे या..’, ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती..’, सर्वात्मका शिवसुंदरा..’ निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा संदेश देणाऱ्या या कविता तोंडपाठ असल्या तरी ते लिहिणारे कवी कोण याबद्दल अनभिज्ञताच असते. दुसरीकडे इतिहासाच्या पुस्तकात नाममात्र उल्लेख असणारे क्रांतीवीर, त्यांचे कार्य, देशाप्रती त्यांनी केलेले समर्पण याविषयी फारशी माहिती नसते. सर्वसामान्यांमधील ही अनभिज्ञता शमविण्याचा प्रयत्न येथील सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिरात आयोजित क्रांतीकारक व साहित्यिकांच्या चित्रमय माहिती प्रदर्शनातून झाला. मराठी राजभाषा दिन आणि स्वा. सावरकर पुण्यतिथी, विज्ञान दिन यांचे औचित्य साधून आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी ‘नाएसो’चे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांच्या हस्ते झाले. सलग तीन दिवस हे प्रदर्शन या ठिकाणी सुरू राहणार असून पुढील काळात ते संस्थेच्या इतर शाळांमध्ये फिरते राहील.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिराच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक अजय बोरस्ते, शाहू खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पी. वाय कुलकर्णी, नानासाहेब शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र निकम आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनाची संकल्पना सीडीओ मेरी शाळेतील शिक्षक आणि संस्थेचे सहकार्यवाह दिलीप आहिरे यांनी मांडली. मराठी साहित्यातीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून आजच्या पिढीचे लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्यापर्यंत अशा १०० लेखकांचा चित्र परिचय करून देण्यात आला आहे. त्यात लेखकाचा संपुर्ण तपशील, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांना मिळालेले सन्मान याविषयी माहिती देण्यात आली आहे. ‘वाचन संस्कृती रुजावी’ या एकमेव उद्देशाने सुरू झालेला हा प्रवास नजीकच्या काळात ५०० साहित्यिकांपर्यंत पोहचण्याचा मानस आहिरे यांनी व्यक्त केला. लेखकांच्या परिचयाठी विविध संकेतस्थळे, संस्थेचे संदर्भग्रंथ, ग्रंथपाल आदींच्या मदतीने माहिती संकलीत करण्यात आली. मराठी, हिंदी भाषेत उल्लेखनिय योगदान दिलेल्या कवी व लेखकांचा परिचय प्रदर्शनातून होतो.
राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने सदोदित कानावर येणारा ‘स्वातंत्र्य संग्राम’ या शब्दाची जवळून ओळख करून देण्यासाठी स्वातंत्र्य लढय़ात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांची माहिती सचिन निरंतर यांनी प्रदर्शनात देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना विरोध दर्शविणारे, इंग्रजांच्या दहशतीला साम, दाम, दंड व भेद नितीद्वारे लढा देणारे, थेट इंग्रजांसमोर उभे राहत एल्गार पुकारणारे ६० हुन अधिक क्रांतीकारकांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यात धनशेठ्ठी, ठाकुर रोशनसिंह, वसंत कुमार, डॉ. माथुरसिंह, प्रिती बहादुर, खुदीराम बोस, अनंत चाफेकर आदी क्रांतीकारकांचा समावेश आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन विविध शैक्षणिक संस्थामध्ये फिरते राहणार आहे. तसेच ही माहितीचे संकलन सुरू असून अधिकाधिक लेखक व क्रांतीकारकांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे आहिरे व निरंतर यांनी सांगितले. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.