चाळीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कामगारांना संरक्षण द्यावे, तसेच आर.एस.पी.एल. या कंपनीतील माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, बेकायदा कमी केलेल्या ग्रीव्हज, कोकाकोला, सिमेन्स, आर्चिड, कास्मो फिल्म्स, ओम लॉजिस्टक्स, गणेश कोटिंग, लील सन्स येथील कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे यांसह विविध मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियनतर्फे बुधवारी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
शहरातील वाळूज ते बाबा पेट्रोलपंप, क्रांती चौकमार्गे रॅलीतील कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने केली. कामगार आयुक्त डॉ. डी. डी. बांबोडे यांना निवेदन दिले. सुभाष लोमटे व अ‍ॅड. सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. माथाडी कायदा पायदळी तुडविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनीही पाठिंबा दिला.