सोलापूरकरांनी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय ‘मविप्र करंडक’ वक्तृत्व स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. वैयक्तिक गटात सोलापूर येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या रोहित देशमुखने प्रथम क्रमांक मिळवला. तर वालचंद महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्रातील नागेश िनबाळकर व विकास नवाळे यांनी प्रतिष्ठेचा मविप्र सांघिक करंडक पटकाविला.
सोमवारी सकाळी रावसाहेब थोरात सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या वेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, वनाधिपती विनायकदादा पाटील, स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, संचालक नानासाहेब महाले, मुरलीधर पाटील, शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. आर. डी. दरेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धा प्रमुख प्रा. डी. पी. पवार यांनी आढावा घेतला. सोलापूरच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या रोहित देशमुखला प्राचार्य शिवाजीराव भोसले पारितोषिक २१ हजार रूपये रोख व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. वैयक्तीक गटात व्दितीय पारितोषिक सोलापूर येथील वालचंद महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ केंद्राच्या विकास नवाळे याला रोख ११ हजार रूपये, तृतीय अहमदनगर येथील न्यू आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेजच्या अशोक शिंदेला रोख पाच हजार रुपये या स्वरूपात देण्यात आले. नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या  खुशबू बुरड, एचपीटी महाविद्यालयाची काजल बोरस्ते व बीड जिल्हयातील कडा येथील आनंदराव घोडे महाविद्यालयाच्या नागेश गवळी यांना उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले.