उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्मक्लेश म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर काल रविवारी दिवसभर उपोषण केल्यामुळे समाधी परिसर अपवित्र झाल्याची टीका करीत हा परिसर पवित्र करण्यासाठी गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न आज भाजपा, शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने आंदोलक कार्यकर्त्यांशी पोलिसांची चांगलीच झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.  
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटसकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय मोहिते, मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपाध्यक्ष महेश जगताप, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुदर्शन पाटसकर, सेनेचे स्वप्नील कुलकर्णी यांच्यासह या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
दुष्काळग्रस्तांबद्दल असभ्य भाषेत वक्तव्य केल्यानंतर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि शरद पवार यांनी केलेल्या कानउघाडणीच्या पाश्र्वभूमीवर काल अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर आत्मक्लेश म्हणून दिवसभर उपोषण केले. या गांधीगिरी विरोधात कालच शिवसेना, भाजपा व मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक निदर्शने करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, अजित पवारांना येथे येण्यापासून आम्ही रोखू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करताना, अजित पवारांच्या उपोषणामुळे समाधी परिसर अपवित्र झाला असून, तो पवित्र करण्यासाठी गोमूत्र शिंपडण्याचा प्रयत्न भाजपा, शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांंनी केला.
या वेळी बोलताना विष्णू पाटसकर म्हणाले की, अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली असून, आत्मक्लेश उपोषण करण्यापेक्षा त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे वाचन केले असते तर किंवा राजीनामा देऊन दुष्काळग्रस्तांसाठी काम केले असते तर बरे झाले असते. परंतु, तसे न करता त्यांना ‘नौटंकी’ करायची होती. म्हणूनच त्यांनी चव्हाणसाहेबांच्या समाधी परिसरात आत्मक्लेश उपोषण केले. त्यामुळे हा परिसर अपवित्र झाला आहे. आज आम्ही गोमूत्र टाकून तो पवित्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय मोहिते म्हणाले की, कराड येथे येऊन अजित पवार यांनी केलेल्या नौटंकीचा शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करित आहोत. अजित पवारांनी तत्काळ राजीनामा देऊन दुष्काळग्रस्तांसाठी काम करावे. अॅड. विकास पवार यांनीही अजित पवारांवर टीका केली.