कोपरगाव तालुक्याच्या विविध समस्या, तसेच गोदावरी कालव्याच्या पाटपाणी प्रश्नांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या समवेत येत्या बुधवारी मंत्रालय मुंबई येथे बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे सुतोवाच जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केले.
संजीवनी सहकारी साखर कारखान्याने २६ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या १२ मेगॅव्ॉट सहवीज निर्मिती व ६० केएलपीडी अल्कोहोल प्रकल्पांचे उद्घाटन आज तटकरे व पाचपुते यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कारखान्याच्या गणेश कार्यस्थळांवर झालेल्या जाहीर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे होते. प्रारंभी संजीवनी कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी प्रास्ताविकात कोपरगाव तालुक्यातील पाटपाण्याचे प्रश्न मांडले. अजित पवार न आल्याने शेतकरी मेळाव्यावर नाराजीचे सावट पसरले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घन:श्याम शेलार, सिद्धार्थ मुरकुटे, उपनगराध्यक्षा मीनल खांबेकर, युवानेते अमित कोल्हे, सुमित कोल्हे आदी उपस्थित होते.
तटकरे पुढे म्हणाले, गेली ५० वर्षे राज्यातील सहकार, शेती आणि साखर कारखानदारीला विधायक दिशा देण्याचे काम माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी केले असून त्यांच्या या कामाने आपण भारावून गेलो आहोत. गोदावरी कालव्यांचे आयुर्मान १०० वर्षांचे झाले असून त्याची बांधकामे जीर्णावस्थेत आहेत. त्याच्या नूतनीकरणांसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार मंजूर असलेल्या ७५ कोटी रुपयांपैकी २० कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या चालू अर्थसंकल्पात करण्यात येईल. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल.  पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याबाबत लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करू अशी ग्वाही तटकरे यांनी दिली. ते म्हणाले, निळवंडे धरणास कालवे नसल्याने साठलेल्या पाण्याचा वापर काही मंडळी स्वत:साठी करून घेत आहेत. मात्र त्याची कृषी विभागाच्या कुठल्याही अहवालात नोंद दिसत नाही. ते काम पूर्ण करण्यासाठी येत्या बुधवारीच मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ.
पाचपुते म्हणाले, जिल्ह्य़ात व राज्यात काम करताना माजीमंत्री शंकररराव कोल्हे यांच्या कार्याचा अनेकांना फायदा झाला आहे. गेल्या ५० वर्षांत त्यांनी केलेल्या कार्यामुळे सहकाराची उंची वाढली आहे. त्यांच्या पारदर्शक कारभारामुळे माजीमंत्री कोल्हे म्हणजेच सहकार अशी नवी व्याख्या रूढ झाली आहे.
स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून बचतगटांना मंजूर झालेल्या १ कोटी १९ लाख रुपये कर्जापैकी रवंदे व संवत्सर येथील सप्तशृंगी व सावित्रीबाई महिला बचतगटांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जाचे धनादेश तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.