मराठी भाषेविषयी २५ वर्षांचे धोरण ठरवता यावे, यासाठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या उपस्थितीत उद्या (शुक्रवारी) मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातील प्राध्यापक, शिक्षक व मराठी भाषाप्रेमींनी मराठी भाषेच्या धोरणासंबंधी या बैठकीत मत व्यक्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये भाषाविषयक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांची मते जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीच्या बैठकींचे आयोजन केले आहे. भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. प्रल्हाद लुलेकर, प्रा. दत्ता भगत, कोल्हापूर येथील डॉ. विश्वनाथ िशदे, डॉ. दादा गोरे व डॉ. संजय गव्हाणे आदी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. धोरण ठरवताना समाजाचा सहभाग असावा, त्यामुळे धोरणाची व्यापकता वाढते, या उद्देशाने या बैठकीचे आयोजन आहे. अभ्यासक, लेखक, समीक्षक, भाषातज्ज्ञ, पत्रकार, मराठीचे प्राध्यापक व शिक्षक यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह कुंडलिकराव अतकरे यांनी केले आहे.