नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) व नेदरलँड कौन्सिल जनरल यांच्यात उद्योग व्यवसायाची देवाण-घेवाण करण्याविषयी सहकार्य करार करण्यात आला. त्या अंतर्गत नेदरलँड कौन्सिल जनरलचे व्यावसायिक सल्लागार बी. बी. बन्सल यांनी इच्छुक उद्योजकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
सहकार्य कराराच्या आधारे निमाने उद्योजकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार प्राधान्यक्रमाने केवळ पहिल्या २५ उद्योजकांना भेटण्याचे नियोजन होते. सलग दोन दिवस बन्सल यांनी मॅगमा पॉलिमरच्या मृदुला जाधव, आहेर इंजिनीअरिंग वर्क्‍सचे खैरनार, वैभव इंजिनीअर्सचे हृषिकेश कुलकर्णी आदींशी संवाद साधून त्यांच्या उद्योगांची माहिती जाणून घेतली. नेदरलॅण्डच्या बाजारपेठेत नाशिकच्या उद्योगांना असलेल्या संधीची माहिती देऊन नाशिकच्या उद्योगांची माहिती नेदरलँडच्या उद्योगांना देऊन तेथील उद्योगांबरोबर समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. उद्योगांच्या वाढीसाठी मार्गदर्शन करून प्राथमिक स्तरावर चर्चा झाली. याप्रसंगी निमा अध्यक्ष धनंजय बेळे व मुख्य समन्वयक प्रकाश प्रधान उपस्थित होते.
निमाने सुरू केलेल्या या उपक्रमास उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून वेळेअभावी प्रथम नोंद केलेल्या २५ उद्योजकांना संवाद साधता आला. उर्वरित उद्योजकांशी पुढील महिन्यात संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पुढील भेटीत इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल, अ‍ॅग्रिकल्चर आदी क्षेत्रांशी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या माध्यमातून स्थानिक उद्योगांना अद्ययावत तंत्रज्ञान व उद्योग वाढ  व   विस्ताराच्या   संधी   उपलब्ध होणार   असल्याचे बेळे यांनी सांगितले.