भारतीय स्त्रीशक्ती महिला संघटनेच्यावतीने शनिवारी (२९ डिसेंबर) टाऊन हॉल ते गांधी चौक या दरम्यान मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन जीवनात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात दरवर्षी वाढ होत आहे. छेडछाड, बलात्कार, हुंडाबळी, एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हत्या अशा अनेक घटनांत निरपराध महिलांचा बळी जातो आहे. दिल्ली येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांचा प्रश्न लोकांसमोर आला आहे. अन्याय करणाऱ्याबरोबरच उघडय़ा डोळ्यांनी निष्क्रियपणे अन्याय पाहणारा समाजही तितकाच जबाबदार आहे. समाजात जागृती घडवण्यासाठी व अशा वाईट कृत्याच्या विरोधी निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी ९ ते ११ या वेळेत या दरम्यान मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थिनी व महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय स्त्री शक्तीच्या अध्यक्षा अनघा अंधोरीकर यांनी केले आहे.