‘बोलक्या बाहुल्यां’चा संचार तसा विश्वव्यापी आहे. देश-परदेशात बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम सादर होतात. हे कार्यक्रम करणाऱ्या मंडळींना ‘शब्दभ्रमकार’ म्हणून ओळखले जाते. या शब्दभ्रमकारांमध्ये के. एस. गोडे हे एक महत्त्वाचे नाव आहे. गोडे यांनी आत्तापर्यंत चारशेहून अधिक बोलके बाहुले तयार केले आहेत. त्यांच्या या कामाची दखल ‘लिम्का बुक रेकॉर्ड’नेही घेतली आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’चा गोडे यांनी तयार केलेला मुखवटा तर अमेरिकेत पोहोचला आहे.
गोडे हे स्वत: उत्तम शब्दभ्रमकार असून गेल्या काही वर्षांत त्यांनी ३०० शब्दभ्रमकार तयार केले आहेत. यापैकी सुमारे १५० जण गोडे यांनी तयार केलेल्या बोलक्या बाहुल्यांचा वापर करून त्यावर आपली उपजीविका करत आहेत. ४०-५० वर्षांपूर्वी भारतात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच शब्दभ्रमकार होते. याचे मुख्य कारण म्हणजे या कलेसाठी लागणारे बोलके बाहुले भारतात तयार होत नसत. ते परदेशातून आणावे लागत. हे लक्षात घेऊन १९७७ मध्ये गोडे यांनी पहिला बोलका बाहुला तयार केला. त्यानंतर गोडे यांनी बाहुले तयार करण्याचा सपाटाच लावला. आज पंचाहत्तीनंतरही त्यांनी बोलका बाहुला तयार करण्यात स्वत:ला गुंतवून ठेवले आहे. एक बाहुला तयार करण्यासाठी सुमारे दोन महिने लागतात. गोडे यांनी तयार केलेल्या बोलक्या बाहुल्यांनी शंभराचा आकडा पार केला तेव्हा त्याची दखल ‘लिम्का बुक रेकॉडर्’ने घेतली होती.
गोडे यांच्या सव्वाचारशे बोलक्या बाहुल्यांपैकी ७५ बाहुले अमेरिका, जपान, हॉलंड आदी देशात विकले गेले आहेत. गोडे यांनी ‘शब्दभ्रम शास्त्र आणि कला’ हे या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक लिहिले आहे. या विषयावरील पहिली दृकश्राव्य ध्वनिफितही गोडे यांनी तयार केली असून त्यांनी लिहिलेल्या ‘मॅजिक ऑफ टॉकिंग डॉल’ या इंग्रजी पुस्तकाचा आंध्र प्रदेशातील तेलुगू विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी समावेश करण्यात आला आहे. राज्य शासन आणि विद्यापीठ स्तरावर या कलेचे रितसर प्रशिक्षण दिले जावे. तरच या कलेचे जतन आणि संवर्धन होईल, असे गोडे यांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
चारशेहून अधिक बोलक्या बाहुल्यांचे जनक!
‘बोलक्या बाहुल्यां’चा संचार तसा विश्वव्यापी आहे. देश-परदेशात बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम सादर होतात. हे कार्यक्रम करणाऱ्या मंडळींना ‘शब्दभ्रमकार’ म्हणून ओळखले जाते.

First published on: 07-03-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mentor of more than 400 speaking puppets record in genis book