उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसअंतर्गत होणा-या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आमदार शरद रणपिसे यांची मंगळवारी निवड झाली. रणपिसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणूक निर्णय अधिकारी ठरला असला, तरी मतदार यादी मात्र अजून अंतिम झालेली नाही. मतदार यादीचा घोळ ‘सरपंच’ पदात अडकला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक कधी व कशा पद्धतीने होणार, या विषयी संभ्रम कायम आहे.
औरंगाबाद व यवतमाळ येथे उमेदवारांची निवड करण्यासाठी काँग्रेसअंतर्गत निवडणूक घेण्याचा निर्णय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला. त्यानंतर ही प्रक्रिया कधी व कशी होईल, या विषयी कार्यकर्त्यांमध्ये आजही उत्सुकता कायम आहे. निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्षांनी सुमारे साडेआठशे जणांची यादी पक्षप्रमुखांकडे पाठविली. ही यादी तयार करताना आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी व सरपंच यांचा समावेश होता. मात्र, सरपंचांनी लढविलेली निवडणूक पक्षाच्या चिन्हावरील नसल्याने कोणता सरपंच पक्षाचा, हे ठरविणे जिकिरीचे होते.
लोकप्रतिनिधींची यादी ४०० ते ४५० मतदारांची झाल्यानंतर उर्वरित नावे सरपंचांची असल्याने इच्छुक उमेदवारांना सरपंचांना खूश करण्याचा नवाच मार्ग शोधावा लागणार आहे. महापालिका हद्दीतील नगरसेवकांना बाजूने वळविण्यासाठी काही खास रणनीतीही आखण्याच्या तयारीत इच्छुक आहेत. विशेषत: काही लक्ष्मीपुत्र आमदारांना या कामी नेमले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची घोषणा झाली असली, तरी रणपिसे यांना औरंगाबाद मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे की नाही, या विषयी शंका घेतल्या जात आहेत. कदाचित मतदारसंघ बदलला जाऊ शकतो, असे रणपिसे यांनी सांगितले.
अंतर्गत निवडणूक घेताना गुप्त मतदान असेल की हात वर करून संख्या मोजली जाईल, हेही अजून नक्की झाले नाही. एके दिवशी सगळे नेते भाषणे करतील व नंतर हात वर करून मतदान घेतले जाईल, असे सांगितले जाते. तसेच ही निवडणूक गुप्त मतदानाने होईल, असेही सांगितले जाते. निवडणुकीच्या पद्धतीबाबतही संभ्रम असल्याने काँग्रेसमध्ये निवडणूक कोण व कशी लढविणार, या बाबत संभ्रम आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
मतदार यादीचा घोळ, ‘सरपंच’ पदाचा तिढा!
उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसअंतर्गत होणा-या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आमदार शरद रणपिसे यांची मंगळवारी निवड झाली. रणपिसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणूक निर्णय अधिकारी ठरला असला, तरी मतदार यादी मात्र अजून अंतिम झालेली नाही.
First published on: 19-02-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mess of voter list confusion over sarpanch seat