फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार देशात रुजविणारी भूमी म्हणून या परिसराला ओळखले जाते. खऱ्या अर्थाने या परिसरातूनच दलित साहित्याच्या निर्मितीला प्रारंभ झाला. त्यामुळे हा परिसर दलित साहित्याची जन्मभूमी आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्रा. डॉ. विमल थोरात यांनी केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने मिलिंद कला महाविद्यालयात आयोजित मराठी, हिंदी व शारीरिक शिक्षण विषयांच्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. थोरात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. डॉ. मनोहर जाधव व डॉ. एस. एस. शेख उपस्थित होते. डॉ. थोरात म्हणाल्या, की पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम दर्जा देऊन त्यांच्यावर सातत्याने अन्याय, अत्याचार सुरू आहे. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले. परंतु अजूनही पुरुषी मानसिकता बदलत नाही म्हणून खैरलांजी, दिल्ली सामूहिक बलात्कारासारख्या घटना वारंवार घडत आहेत. एकेकाळी मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी देशाचे वैभव होता. मिलिंदला पुन:वैभव मिळवून देण्यासाठी पुन्हा प्रयत्न होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. जाधव यांनी दलित साहित्य हे साहित्य क्षेत्राचे अपरिहार्य अंग असल्यानेच मराठी साहित्याची ओळख जागतिक स्तरावर झाली. दु:ख, वेदना, शोषण, मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा संघर्ष हे सर्व दलित साहित्यात चित्रित झाले. ही चळवळ गेल्या अर्धशतकापासून सुरू आहे. या चळवळीला डॉ. आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा असल्यामुळेच ही चळवळ व्यापक होत असल्याचे सांगितले. डॉ. शेख यांनी क्रीडा मानसशास्त्राचा आढावा घेतला. विविध संघ खेळांमध्ये पराभूत का होतात, हे तपासण्यासाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती केली जाते व त्यांच्या माध्यमातून विजयासाठी प्रयत्न केले जातात. सुदृढ शरीरात मन असते म्हणून सर्वानी मैदानात जाण्याची, व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. व्यायामामुळे शारीरिक व मानसिक विकास होतो, असे सांगितले.
प्राचार्या डॉ. प्रधान म्हणाल्या, की अलीकडील काळात आंतर विद्याशाखीय अभ्यासाला महत्त्व दिले जात असल्यानेच ३ विषयांचे चर्चासत्र एकत्रित आयोजित केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल, तर सूत्रसंचालन प्रा. सुजित गायकवाड यांनी केले.